UPSC : आई विडी कामगार तर वडील शेतकरी, हार न मानता मंगेशनं अखेर करून दाखवलं

प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 24 मे : यूपीएसी परीक्षेचा अंतिम निकाल आता जाहीर झालाय. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या प्रत्येकाचाच प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांनी आपला फोकस ढळू न देता देशातील प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश मिळवलंय. या परीक्षेत मराठी मुलांनीही बाजी मारली. पुण्यात शिकणारा मंगेश खिलारी हा 396 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालाय. मंगेशनं खडतर परिस्थितीवर मात करत हे यश मिळवलंय.
खडतर प्रवासानंतर यश
तुमच्या शहरातून (पुणे)
मंगेश खिलारी हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचा आहे. त्याची आई बिडी कामगार आहे. तर वडिल शेती करत चहाची टपरी चालवतात. घरातील परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे त्याच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. पण, या अडचणीतही मंगेशसमोरील ध्येय स्पष्ट होतं.
मंगेशनं ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षातच युपीएससीच्या अभ्यासाला सुरूवात केली. गेल्या चार वर्षांपासून तो हा अभ्यास करत आहे. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्यानं हे यश मिळवलंय. ‘मागच्या वर्षी मी मुलाखतीपर्यंत गेलो होतो पण, फक्त 3 मार्कांनी माझी संधी हुकली होती. त्यानंतर मी नव्या जोमानं अभ्यास केला.
भाजी विकून वडिलांनी शिकवलं, आज लेकाने UPSC पास करून दाखवलं
माझ्या आई-वडिलांनी घरात बिकट परिस्थिती असूनही माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी पुण्यात जाऊन शिक्षण घेऊ शकलो. तुझे आयडॉल कोण? असा प्रश्न मला युपीएससीच्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावेळी माझे आई-वडील हेच माझे आयडॉल असल्याचं मी सांगितलं होतं. माझ्या घरात सरकारी नोकरी मिळवणारा मी पहिलाच व्यक्ती आहे,’ असं मंगेशनं यावेळी सांगितलं.
मंगेशनं दिला महत्त्वाचा सल्ला
युपीएसी परीक्षेची तयारी लाखो विद्यार्थी करत असतात. मंगेशनं ही तयारी करणाऱ्या सर्वांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘नवीन विद्यार्थ्यानं परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. युपीएससीनं मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम निश्चित केला आहे. त्याच अभ्यासक्रमावर फोकस केला तर यश मिळू शकते. ही परीक्षा खडतर आहे. तसंच इथं स्पर्धाही मोठी आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संयम आवश्यक असून स्वत:वर विश्वास देखील हवा,’ असा सल्ला मंगेशनं दिलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.