Twitterला मिळणार नवा बॉस, कोण घेणार पराग अग्रवालांची जागा? एलॉन मस्क घेतायेत शोध

मुंबई, 17 नोव्हेंबर: कर्मचार्यांची कपात, कंपनीच्या पॉलिसीतील मोठे बदल आणि ट्विटरमधील अनेक वादग्रस्त निर्णयांनंतर आता अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरला लवकरच नवा बॉस मिळणार असल्याचं म्हटलं आहे, कारण ते कंपनीतील आपला वेळ कमी करणार आहे. एलॉन मस्क म्हणाले की, आता ते ट्विटर चालवण्यासाठी नवीन लीडरच्या शोधात आहेत.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे की, “अधिग्रहणानंतर कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्याची गरज आहे. पण मला ट्विटरवरील माझा वेळ कमी करायचा आहे. एलॉन मस्क यांनी हे देखील मान्य केलं की काही टेस्ला इंजिनियर ट्विटरच्या अभियांत्रिकी संघांना मदत करत होते.
एलॉन मस्क यांना हवंय नवं मॅनेजमेंट-
मस्क यांनी बुधवारी सांगितलं की, ते ट्विटरची पुनर्रचना लवकरच पूर्ण करतील, अशी त्यांना आशा आहे. किंबहुना अधिग्रहणानंतर लगेचच मस्क यांनी कंपनीचे पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकलं. त्याचबरोबर कंपनीच्या वाढत्या खर्चामुळं आणि खर्चात कपात करण्यासाठी 3700 कर्मचाऱ्यांनाही कंपनीतून कार्यमुक्त करण्यात आलं.
हेही वाचा: कमालच आहे राव! ट्विटर ब्लू टिकसाठी पैसे देण्यात भारतीयांना रसच नाही, वाचा इंटरेस्टिंग कारण
या निर्णयांमुळे एलॉन मस्क जगभरातील टीकाकारांच्या निशाण्यावर आले होते. मात्र, स्वत:चा बचाव करताना ते म्हणाले की, दुर्दैवानं माझ्याकडे पर्याय नव्हता. कारण कंपनीला दिवसाला 4 दशलक्ष डॉलर तोटा होत होता. त्यामुळं आम्हाला टाळेबंदीसारखा कठोर निर्णय घेणं भाग पडलं.
एलॉन मस्क यांनी नुकतीच केली होती कर्मचारी कपात-
एलॉन मस्क यांनी ट्विवटरचा ताबा घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले. यामध्ये ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकलं. यानंतर त्यांनी कर्मचारी कपात केली. ट्विटर यांनी एका मागोमाग एक घेतलेल्या धक्कादायक निर्णयांमुळं कंपनीतील कर्मचाऱ्यांचं धाबंं दणाणलं होतं. एलॉन मस्क यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर जगभरातून टीकेची झोड उठली होती.
त्यानंतर ट्विटरमध्ये ब्लू टिक अर्थात अकाउंट वॅलिड अकाउंटसाठी शुल्क घेण्याच्या निर्णयावरही जगभरातून टीका होत होती. यातील त्रुटींमुळं काही कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याच्याही बातम्या समोर आल्या हो्त्या. या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क यांनी ट्विटरला नवा बॉस मिळतील याचे संकेत दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.