Smartphone Battery : 10, 20 की 30 टक्के… मोबाईल फोन कधी चार्जिंग करावा?

smartphone-battery-:-10,-20-की-30-टक्के…-मोबाईल-फोन-कधी-चार्जिंग-करावा?

डिजिटल युगात मोबाईल फोनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वाढला आहे, पण फोनचा वापर करताना फोनची बॅटरी कधी आणि किती चार्ज करावी याची माहितीही असायला हवी

Updated: Dec 27, 2022, 01:32 PM IST

Mobile Battery Charging: सध्याच्या डिजिटल युगात (Digital) मोबाईल फोन (Mobile Phone) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलमुळे आपली अनेक दैनंदिन कामं सोपी बनली आहेत. लाईट बिल, गॅस बिल भरण्यापासून अगदी शॉपिंग करण्यापर्यंत सर्व कामं मोबाईलद्वारे घरबसल्या केली जाऊ शकतात. मोबाईल नसणं ही कल्पनाच आपण आता करु शकत नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन (Lock Down) काळात शिक्षणही अगदी ऑनलाईन (Online) झालं. यात मोबाईलचा सर्वाधिक वापर झाला. मोबाईलमुळे सातासमुद्रा पार असलेल्या व्यक्तीशीही आपण कधीही संपर्क साधू शकतो. 

साहजिकच आपल्या आुयष्यात स्मार्ट फोनचा (Smart Phone) वापर वाढलाय, पण मोबाईलच्या बॅटरीचं (Mobile Battery) लाईफ किती असतं याबाबत विचार केला आहे का? आपला मोबाईल फोन कधी आणि कितीवेळा चार्ज (Charging) करावा याबाबत किती जणांना योग्य माहिती असते? नसेल माहिती तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुमच्या स्मार्टफोनचं लाइफ आणि बॅटरीशी संबंधित महत्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फोन चार्च करण्याची पद्धत
आपण दिवसभर स्मार्टफोनचा वापर करतो, याचा अर्थ असा नाही की आपला स्मार्टफोन सारखा चार्ज करायला हवा. फोन योग्य पद्धतीने चार्ज केला तर स्मार्टफोनच्या बॅटरीचं लाईफही वाढतं. अनेकजणं विचार करतात की आपला स्मार्टफोन शंभर टक्के चार्ज करावा म्हणजे तो दिवसभर वापरता येईल. यामुळे बॅटरीही फार काळ टिकेल. पण तुम्ही जर असा विचार करत असाल तर ते साफ चुकीचं आहे. तज्ज्ञांच्या मते स्मार्टफोन केवळ 80-90 टक्के चार्च करावा. बॅटरी 100 टक्के चार्ज केल्याने तिच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकते आणि ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. 

स्मार्ट फोन कधी चार्जिंग करावा?
स्मार्टफोन पूर्ण डिस्चार्ज झाल्यावर चार्जिंगला लावण्याची सवय काही जणांना असते. तुम्ही पण हीच चुक करत असाल तर जाणून घ्या फोन नेमका कधी चार्ज करावा.  रिचार्ज करण्यासाठी बॅटरी 5 टक्क्यांपर्यंत कमी होईपर्यंत प्रतिक्षा करणं योग्य नाही. फोनची बॅटरी 20 टक्क्यांवर आल्यावर फोन चार्जिंग करावा. तज्ज्ञांच्या मते 20 ते 80 टक्के बॅटरी स्मार्टफोनसाठी योग्य मानली जाते. 

रात्रभर मोबाईल चार्जिंग करणे टाळा
दिवसभर फोन वापरल्यानंतर आपण रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावतो. पण अशी चूक कधीही करु नका. जेव्हा बॅटरी 100 टक्के चार्ज होते, तेव्हा स्मार्टफोन तातडीने अनप्लग करणे आवश्यक आहे. रात्री झोपायला जाण्यापूर्वी चार्जिंगला लावलेला फोन सकाळी पूर्ण चार्ज झाल्यावरच अनप्लग केला जातो, चुकीचं असून, यामुळे दुर्घटना घडण्याचीही शक्यता असते.  

चार्जिंगला असताना फोन वापरणं धोकादायक
चार्जिंग सुरु असताना मोबाईल वापरणं सर्वात धोकादायक ठरु शकतं. फोन चार्जिंगला असताना बोलणं, किंवा गेम खेळल्यास फोन प्रमाणापेक्षा जास्त गरम होतो. याशिवाय स्मार्टफोन चार्जिंगला लावता, तेव्हा त्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश किंवा तीव्र सूर्य किरणं येत नाहीत ना हे पाहणं देखील आवश्यक आहे. प्रमाणापेक्षा जास्त वेळ फोन चार्जिंग केल्याने बॅटरीवर विपरित परिणाम होऊन तिचा लाईफस्पॅन कमी होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *