RSS मुख्यालय पुन्हा हिट लिस्टवर? नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अज्ञात फोन अन्…

rss-मुख्यालय-पुन्हा-हिट-लिस्टवर?-नव्या-वर्षाच्या-मुहूर्तावर-अज्ञात-फोन-अन्…

नागपूर : नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रूमला शनिवारी एक धमकीचा फोन आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेनंतर संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढही करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फोन करणाऱ्या व्यक्तीने मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी दिली. यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला असून काही प्रमाणात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सीआरपीएफची एक तुकडी यापूर्वीपासूनच तैनात असून अतिरिक्त पोलीस बळही तैनात करण्यात आलं आहे.

जून 2006 मध्ये लष्कर-ए-तैयब्बाच्या तीन दहशतवाद्यांना बंदुकीसह संघ मुख्यालयात प्रवेश करताना ताब्यात घेण्यात आले होते. याशिवाय मागील काळातही अनेकदा संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गतवर्षी देखील पोलिसांनी नागपूरमधील संघ मुख्यालयाची रेकी केल्याच्या संशयावरुन कश्मीरमधून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. रहीस अहमद शेख असे त्याचे नाव होते. या दहशतवाद्याने डॉ. हेडगेवार स्मृति मंदिराची रेकी केली असल्याचीही माहिती पोलिस तपासातून उघड झाली होती.

त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रईसला जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर असलेल्या उमर याने नागपुरात पाठवले होते. श्रीनगरवरून मुंबई आणि मुंबईवरून नागपूर असा विमानप्रवास करुन रईस रेकी करण्यासाठी आला होता. केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती रईस लागला आणि त्यानेच नागपुरात रेकी केली असल्याची माहिती यंत्रणेला दिली होती. संशयितांनी नागपुरातील अनेक प्रसिद्ध परिसरांचे फोटो आणि व्हीडिओ तयार केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *