PUNE : 13 डिसेंबरला विरोधकांची पुणे बंदची हाक, हे पक्ष होणार सहभागी

17 डिसेंबरला मुंबई महामोर्चाची घोषणा केल्यानंतर आता 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.
पुणे : विरोधकांनी 13 डिसेंबरला पुणे बंदची (Pune Band) हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा आणि भाजपनं महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी या बंदची हाक देण्यात आली आहे. ( Opposuiton parties call for Pune bandh on December 13 )
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटही या बंदमध्ये सहभागी होत आहे. महाविकासआघाडीने याआधीच १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. विरोधक सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. महाविकासआघाडीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
राज्यपालांना हटवण्याची मागणी महाविकासआघाडीने केली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
राज्यपाल आणि शिंदे सरकारला विरोधकांकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विरोधक आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे १९ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील विरोधकांची आक्रमक भूमिका दिसण्याची चिन्ह आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यपाल आणि सरकार अडचणीत सापडलं आहे. सोबतच बेळगाव सीमा प्रश्नावरुन देखील विरोधकांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असणार आहे.