Ponniyin Selvan 2:

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार पोन्नियिन सेल्वन 2; टीझर पाहताच वाढली प्रेक्षकांची उत्सुकता
Ponniyin Selvan 2: ‘पीएस 1’च्या यशानंतर ‘पोन्नियिन सेल्वन 2’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित
Image Credit source: Youtube
मुंबई: मणीरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 1’च्या प्रचंड यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 2’चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लायका प्रॉडक्शन्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टीझर पोस्ट करत चाहत्यांना प्रदर्शनाच्या तारखेविषयी माहिती दिली. पीएस- 2 मध्ये विक्रम, ऐश्वर्या राय, कार्ती आणि जयम रवी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटाची पटकथा मणीरत्नम यांनी एलांगो कुमरावेल यांच्यासोबत मिळून लिहिली आहे. तर ए. आर. रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. मणीरत्नम यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून यात अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.
पोन्नियिन सेल्वनमध्ये त्रिशा कृष्णन, प्रकाश राज, जयराम, सोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी यांच्याही भूमिका आहेत. यामध्ये ऐश्वर्याने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. सूड घेण्यासाठी सज्ज असणारी राणी नंदिनी आणि मंदाकिनी देवी अशा दोन भूमिका तिने साकारल्या आहेत. पहिल्या भागातील तिच्या दमदार अभिनयाची प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रशंसा झाली होती.
पहा टीझर-
या चित्रपटात कार्तीने वंथियाथेवन या शूर आणि साहसी योद्धाची भूमिका साकारली आहेत. तर विक्रम हा अदिथा करिकलन, जयम रवी हा अरुलमोझिवर्मन आणि त्रिशा ही कुंदावईच्या भूमिकेत आहे.
पोन्नियिन सेल्वन- 1 हा यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. मूळ तमिळ भाषेत असलेल्या या चित्रपटाचं डबिंग हिंदी, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये करण्यात आलं होतं. थिएटरनंतर ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला.
पीएस-1 ने जगभरात 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. कल्की कृष्णमूर्ती यांच्या तमिळ कादंबरीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. दक्षिणेतील सर्वांत शक्तीशाली राजांपैकी एक असलेल्या अरुलमोझिवर्मन यांची ही कथा आहे. दहाव्या शतकात त्यांनी चोल साम्राज्यावर राज्य केलं होतं.