Pele On Mbappe

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी फ्रेंच स्टार स्ट्रायकर किलियन एमबाप्पेचे (Pele On Mbappe) अभिनंदन केले आहे. २४ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केल्याबद्दल पेले यांनी एम्बापेचे अभिनंदन केले. पेले सध्या रुग्णालयात असून ते कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी झुंज देत आहेत. याबद्दल एम्बाप्पेने सोशल मीडियावर ट्विट करत पेले लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.

या ट्विटवर पेलेंनी उत्तर दिले आहे, त्यात ते म्हणाले की, धन्यवाद किलियन एम्बाप्पे या विश्वचषक स्पर्धेत तुला माझा आणखी एक विक्रम मोडताना पाहून मला आनंद झाला, मित्रा! पोलंडविरुद्धच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात २३ वर्षीय एम्बाप्पे शानदार गोल करून यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात एकूण ९ गोल नोंदवले. वयाच्या २४ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या खेळाडूने विश्वचषकात केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. याआधी पेले यांनी २४ वर्ष होण्यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत ७ गोल करणाचा विक्रम पेले (Pele On Mbappe) यांनी केला होता.

पेले यांनी १९५८ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सहा गोल केले होते. यानंतरच्या पुढील विश्वचषक स्पर्धेत त्यांनी १९६२ च्या विश्वचषकात एक गोल नोंदवला होता. उपांत्यपूर्व फेरीतील फ्रान्सचा सामना रविवारी इंग्लंड संघाशी होणार आहे. दुसरीकडे, पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे मंगळवारी डॉक्टरांनी सांगितले. ८२ वर्षीय पेले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना श्वासोच्छवासाच्या संसर्गाच्या उपचारांसाठी आठवडाभर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

अल्बर्ट आइनस्टाइन हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे की, पेले कॅन्सरशी झुंज देत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्याची परिस्थिती सुधारत आहे. त्यांच्यावर सध्या केमोथेरपी सुरू आहे. तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून पेले यांना त्यांच्या चाहत्यांकडून भरभरून प्रेम व सदिच्छा मिळत आहे.

हेही वाचा;

  • FIFA WC Spain : फुटबॉल विश्वचषकानंतर स्पेनच्या प्रशिक्षकांची उचलबांगडी
  • शाळा सुरू करण्यासाठी महापुरूषांनी भीक मागितली; चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान
  • कुर्ला : टॅक्सी चालकांना प्रवासी बनून लुटणारी टोळी गजाआड