Pele : राष्ट्राध्यक्ष बनू इच्छिनाऱ्या पेले यांच्याबद्दल माहीत नसलेल्या जाणून घ्या ‘या’ गोष्टी | पुढारी


पुढारी ऑनलाईन : पेले (Pele) यांनी त्यांच्या कारकिर्दीत संपूर्ण फुटबॉल विश्वावर अधिराज्य गाजवले होते. पेले यांनी फुटबॉलमधून 1977 साली निवृत्ती घेतली होती, पण आजही त्यांच्या अविस्मरणीय खेळींची चर्चा फुटबॉल चाहत्यांमध्ये कायमच सुरू राहील. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 1363 सामने खेळले. पेले यांच्या नावावर तब्बल 1281 गोल करण्याचा विक्रम आहे. पेले यांनी आपल्या देशाला तीन वेळा फिफा वर्ल्डकप जिंकून दिला आहे. अशी कामगिरी करणारे ते जगातील एकमेव खेळाडू आहेत. पेले यांच्या खेळाबाबत आणि त्यांच्या विक्रमांबाबत शेकडो किस्से जगभरात सांगितले जातात, पण त्यांच्या जीवनाबाबत अशा काही गोष्टीसुद्धा आहेत, त्या लोकांना फारशा माहीत नाहीत.
राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रयत्न (Pele)
1990 साली पेले यांनी राजकारणात उतरण्याबाबत सांगितले होते. आपण 1994 च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले होते. राजकारणात दाखल होऊन पेले 1995 ते 1998 पर्यंत ब्राझीलचे क्रीडामंत्री होते, पण ते राष्ट्राध्यक्ष बनू शकले नाहीत. या काळात ब्राझीलच्या खेळाडूंना क्लब बनवण्याचे स्वातंत्र्य देणारा कायदा निर्माण करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पेले खेळत असताना ज्या गोष्टी शक्य नव्हत्या. त्यांना पेले यांनी मंजुरी मिळवून दिली.
पेले यांच्यामुळे रोखले गेले गृहयुद्ध
1960 च्या दशकात पेले (Pele) यांचा सँटोस एफसी जगातील सर्वांत लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक होता. याचा फायदा घेऊन हा संघ जगभरात अनेक मैत्रीपूर्ण सामने खेळायचा. त्यावेळी नायजेरियामधील युद्धग्रस्त भागात 4 फेब्रुवारी 1969 रोजी एक सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात सँटोस क्लबने बेनिनी सिटीच्या एका स्थानिक क्लबला 2-1 ने मात दिली होती. त्यावेळी नायजेरियामध्ये गृहयुद्ध सुरू होते. इतिहासकार ग्यूहरमें गॉरचे यांच्या मते, ब्राझीलचे खेळाडू आणि अधिकारी सुरक्षेच्या कारणावरून चिंताग्रस्त होते. यामुळे दोन्ही पक्षांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. पेले यांच्या दुसर्या आत्मकथेत या घटनेचा उल्लेख करण्यात आला होता. या एका सामन्यामुळे नाजरेरियातील गृहयुद्ध थांबू शकते, असे खेळाडूंना सांगण्यात आले होते, असे पेले यांनी आत्मकथेत लिहिले आहे. आम्ही तिथे होतो, तोपर्यंत कुणीही त्याठिकाणी घुसखोरी करणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती, असे पेलेंनी लिहिले आहे.
पेलेसाठी इंग्लंडचा राजाही नमला
सन 1963 मध्ये राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलिप यांनी ब्राझीलला भेट दिली तेव्हा त्यांनी पेलेचा (Pele) खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. खेळ संपल्यानंतर ड्यूकना पेलेचे अभिनंदन करायचे होते तेव्हा मोठा पेच निर्माण झाला की आता प्रिन्सनी स्वत: मैदानावर जावे, की फुटबॉलसम्राटाने प्रिन्सपुढे यावे? पण प्रिन्स फिलिपनी सर्व राजशिष्टाचार बाजूला ठेवून स्वत: मैदानावर जाऊन पेलेचे अभिनंदन केले.
व्यक्ती एक.. नावे अनेक
ब्राझीलमध्ये त्याला ‘ब्लॅक पर्ल’ असे म्हणतात. इटली व भारतात लोक त्याला ‘पेले’ म्हणून ओळखतात तर चीन व चिलीमध्ये एल-पेलिग्रा हे नाव त्याला देण्यात आले आहे. फ्रान्सवासीयांनी ‘ब्लॅक ट्यूलिप’ असे नाव त्याला सन्मानपूर्वक दिले आहे. याशिवाय ‘दि नॉव्हेल्टी’, ‘सॉकर किंग’, ‘दि किंग’, ‘ब्ल्यू पार्क’, ‘ब्लॅक सीजर’, ‘फॅबुलस’, ‘डिव्हाईन’ अशा अनेक नावांनी त्याला संबोधिले जाते.
पेले… सिर्फ नाम ही काफी है!
ब्राझील हा देश पेलेच्या नावामुळे ओळखला जाऊ लागला. दर दिवशी त्याच्या अगणित चाहत्यांकडून त्याला अनेक पत्रे येतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पत्राच्या पत्त्याच्या जागेवर फक्त एकच शब्द लिहिलेला असतो ‘पेले’, बाकी पत्ता लिहिलेलाच नसतो. कधी कधी देशाचे नावही लिहिलेले नसते. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ब्राझीलमधील कोराकोसा या गावी रस्त्यावर भुईमुगाच्या शेंगा विकणारे पेले ब्राझीलमधील पंधरा मोठ्या करोडपतींपैकी एक गणले जाऊ लागले.
शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व
शनिवार एक ऑक्टोबर 1977 या दिवशी पेले यांनी न्यू जर्सी येथे त्यांच्या आयुष्यातील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. त्याचा आयुष्यातला हा शेवटचा सामना अत्यंत अद्भूत व आश्चर्यकारक होता. फुटबॉलच्या इतिहासात असा सामना झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही, अशी या सामन्याची नोंद आहे. या सामन्यात पेले खेळाच्या सुरुवातीला (पूर्वार्धात) न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून खेळला आणि विश्रांतीनंतर (उत्तरार्धात) ब्राझीलच्या सँटोस संघाकडून खेळला. या सामन्यात पूर्वार्धात कॉसमॉसकडून खेळताना त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील एक हजार 278 वा शेवटचा गोल करून आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम ठोकला. याच दिवशी पेलेला सार्या जगाचे नागरिकत्व बहाल करण्यात आले.
पेले यांचा जीवन परिचय
नाव : पेले
पूर्ण नाव : एडसन अरांटीस डो नैसीमेंटो.
जन्म : 23 ऑक्टोबर 1940
जन्म स्थान : ट्रेस कोरकोएस, ब्राझील
राष्ट्रीयत्व : ब्राझीलियन
व्यवसाय : फुटबॉल खिलाडी.
वडील : डॉनडीनहो
आई : डोना सेलेस्टी अरांटीस
पत्नी : 3 पत्नी
मुले : 3 मुले, 3 मुली
५० व्या वर्षी ब्राझीलचे कर्णधार
पेले फक्त एकदा ब्राझीलचे कर्णधार बनले. त्या आधी प्रत्येकवेळी त्यांनी क्लब आणि देश दोन्ही संघांचे कर्णधारपद नाकारले होते. राष्ट्रीय संघातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर 19 वर्षांनी म्हणजेच 1990 मध्ये त्यांनी एका मैत्रीपूर्ण सामन्यात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी ब्राझील विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असा तो सामना झाला. हा सामना पेले यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त खेळवण्यात आला होता. या सामन्यात पेले कर्णधार होते.
पेले यांच्यामुळे पंचास बाहेर जावे लागले
18 जून 1968 ची गोष्ट आहे. पेले यांचा फुटबॉल क्लब सँटोस आणि कोलंबियन ऑलिम्पिक स्क्वॉड यांच्यात एक मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात येणार होता. यादरम्यान, पंच गुईलेरमों वेलासक्वेज यांनी पेले यांना मैदानातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी रेड कार्डची पद्धत अस्तित्वात नव्हती. (रेड कार्डचा वापर 1970 साली सुरू झाला) पेले यांच्यावर फाऊल केल्याचा आरोप होता. पेलेंनी पंच वेलाक्वेज यांचा अनादर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पण, पंचांच्या या निर्णयावरून प्रचंड मोठा वाद झाला. सँटोस क्लबच्या खेळाडूंनी याला विरोध दर्शवला. तिथे उपस्थित प्रेक्षकही पंचाच्या या निर्णयावर भडकले, त्यांनी दंगा करण्यास सुरुवात केली. शेवटी पेलेना मैदानात बोलावून स्वत: पंच वेलासक्वेज यांना मैदानाबाहेर जावे लागले. त्यांनी आपली शिट्टी एका लाईन्समनला दिली. स्वत: वेलाक्वेज यांनी 2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
युरोपच्या क्लबसाठी का खेळू शकले नाहीत?
पेले यांनी युरोपमधील कोणत्याही क्लबकडून फुटबॉल खेळला नाही, अशी टीका त्यांच्या टीकाकारांकडून केली जाते, पण हीच गोष्ट पेले यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचे सांगितले जाते. ब्राझीलच्या इतर अनेक खेळाडूंप्रमाणेच पेलेसुद्धा आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर होते. त्यावेळी त्यांना परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले. त्यावेळी आपण कुठून खेळावे याचा निर्णय खेळाडूंच्या हातात नसायचा. पेले यांनी ब्राझीलमध्येच राहावे, यासाठी सरकारकडूनही दबाव होता. 1961 मध्ये राष्ट्रपती जॅनियो क्वाड्रोस यांनी तर चक्क पेले हे राष्ट्रीय संपत्ती असल्याचे घोषित केले. त्यांना एक्स्पोर्ट करता येऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. पण नंतर 1975 मध्ये पेले यांनी न्यूयॉर्क कॉसमॉस या परदेशी क्लबकडून सामने खेळले.
लेनन यांची भेट
पेले 1975 मध्ये न्यूयॉर्कमधील कॉसमॉस क्लबकडून खेळण्यासाठी अमेरिकेला गेले होते. तिथं त्यांनी इंग्रजी भाषा शिकण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी बिटल्समधील गायक आणि गिटारवादक जॉन लेनन यांच्याशी पेले यांची भेट झाली. लेनन त्यावेळी जपानी भाषा शिकत होते. पेले म्हणतात, बिटल्स आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी इंग्लंडच्या एका हॉटेलात ब्राझील संघाला भेटण्याचे प्रयत्न केले होते, पण ब्राझील फुटबॉल असोसिएशनच्या संचालकांनी त्यांना खेळाडूंना भेटण्यापासून रोखले होते, असे लेननने सांगितले होते.
सिल्व्हेस्टर स्टेलॉन फिके पडले
1980 च्या दशकात सिल्व्हेस्टर स्टेलॉन अत्यंत लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जात. त्यांच्या ‘एस्केप टू व्हिक्टरी’ या चित्रपटाचे शूटिंग 1980 साली सुरू झाले होते. हा चित्रपट दुसर्या महायुद्धात नाझी आणि कैदी यांच्या फुटबॉल संघांबाबत एक काल्पनिक कहाणी होती. अनेक माजी फुटबॉलपटू या चित्रपटात काम करत होते. पेलेसुद्धा त्यामध्ये होते. पेले यांनी एका द़ृश्यात एक्रोबॅटिक बायसिकल शॉट मारला होता. पेले यांनी या चित्रपटाबाबत एक किस्सा सांगितला आहे. ते सांगतात, चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार, हा शॉट स्टेलॉन हे मारणार होते. तर गोलकिपर पेले असणार होते. पण स्टेलॉन किक मारूच शकले नाहीत. पेले गोलकिपर म्हणूनही चांगले होते. सँटोस क्लबकडून त्यांनी चारवेळा गोलकिपरची भूमिका बजावली. यात 1964 साली खेळवल्या गेलेल्या ब्राझीलियन कपचा सेमीफायनल सामन्याचा सुद्धा समावेश आहे. या चारही सामन्यांत पेले यांनी विरोधी संघाला गोल करू दिला नाही. हे सर्व सामने पेले यांच्या संघानेच जिंकले.
अधिक वाचा :
- Pele Dies at 82 : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन
- Pele Football God : फुटबॉलचा देव (१९४० – २०२२)
- IND vs AUS Test : मिचेल स्टार्क, कॅमेरून ग्रीन भारताविरूध्दच्या मालिकेला मुकणार