Padma Awards: मुलायम सिंह यांना पद्म विभूषण, सुधा मूर्तींना पद्म भूषण, झुनझुनवालांना पद्म श्री; पाहा यादी

padma-awards:-मुलायम-सिंह-यांना-पद्म-विभूषण,-सुधा-मूर्तींना-पद्म-भूषण,-झुनझुनवालांना-पद्म-श्री;-पाहा-यादी

Padma Awards 2023: केंद्र सरकारने 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  सन 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 106 पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब करत मंजूरी दिली आहे. यंदाच्या वर्षी एकूण 106 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा एकूण 19 महिलांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे. यापैकी परदेशी, एनआरआय, पीआयओ, ओसीपी या श्रेणीमध्ये दोन पद्म विजेत्यांचा समावेश आहे. तर 7 मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचाही समावेश या यादीमध्ये आहे.

मुलायम सिंह यांना पद्म विभूषण

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ओआरएसचे जनक दिलीप महालनोबिस यांनाही मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच संगीतकार झाकीर हुसैन, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, बालकृष्ण दोशी (मरणोत्तर) तसेच गणिततज्ज्ञ श्रीनिवास वर्धन यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

सुधा मूर्तींना पद्म भूषण

यंदा एकूण 9 जणांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये लेखिका सुधा मूर्ती, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांचा समावेश आहे. एसएल भयरप्पा, दीपक धर, वाणी जयराम, स्वामी चिन्ना जीयर, सुमन कल्याणपूरकर, कपिल कपूर, कमलेश डी पटेल यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

झुनझुनवाला, रविना टंडन पद्म श्री

शेअर मार्केटमधील मोठं नावं असं नाव कमावलेले आणि मागील वर्षीच निधन झालेल्या राकेश झुनझुनवाल यांनाही पद्म श्री पुरस्कार (मरणोत्तर ) जाहीर झाला आहे. ‘आरआरआर’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एम. एम. कीरावनी, अभिनेत्री रविना टंडन यांना पद्म श्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 91 जणांना पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

ओआरएस शोधणाऱ्या महालनोबिस यांना पद्म विभूषण

पश्चिम बंगालचे रहिवाशी असलेल्या डॉक्टर दिलीप महालनोबिस यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन म्हणजेच ओआरएस तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या 87 वर्षीय दिलीप महालनोबिस यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ओआरएसच्या माध्यमातून जगभरामध्ये पाच कोटी लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं आहे. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये दिलीप महालनोबिस यांचं निधन झालं.

यांचाही ‘पद्म श्री’ने सन्मान

रतन चंद्र कार यांना आंदमान आणि निकोबारमध्ये वैदकीय सेवेसाठी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. रतन चंद्र कार यांनी जरवा जमातीच्या लोकांसाठी विशेष काम केलं आहे. 1999 साली आलेली साथ असेल किंवा या जमातीमधील संस्कृती जतन करण्यासाठी रतन यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. गुजरातमधील हिराबाई लोबी यांना समाजसेवेसाठी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 62 वर्षीय हिराबाई या येथील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी, महिलांसाठी काम करतात.

मोफत उपचार करणारे डॉक्टर ते कृषी क्षेत्रातील विजेते

तुला राम उपरेती यांना कृषी क्षेत्रातील कामासाठी, निकाराम शर्मा यांनाही कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर आदिवासी हो भाषेसाठी काम करणाऱ्या जानूम सिंह सोय यांनाही पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मध्य प्रदेशमध्ये मागील 50 वर्षांपासून गरिबांना मोफत सेवा देणाऱ्या मुन्शीवर चंद्र दावर यांना पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केवळ 20 रुपयांच्या माफक दरात दावर गरिबांवर उपचार करतात. आसाममधील रामकुवांम्बे न्यूमी यांना यांना पद्म श्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच समाजसेवक व्ही. पी. अप्पुकुट्टन पौडवाल, स्वस्त आरोग्य सेवा पुरवणाऱ्या साखुरथारी चंद्र शेखर, प्राण्यांसाठी काम करणारे वाडिवल गोपाल आणि मासी सादानिया या जोडीलाही पद्म श्री पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *