Mrs. World 2022: 21 वर्षांची प्रतीक्षा संपली; भारताच्या सरगम कौशलने जिंकला

Sargam Kaushal
Image Credit source: Instagram
लास वेगास: भारताची ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब जिंकण्याची 21 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. भारताची सरगम कौशल मिसेस वर्ल्ड 2022 ची विजेती ठरली. या सौंदर्यस्पर्धेचं आयोजन अमिरेकेत करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांनीही हजेरी लावली होती. तब्बल 21 वर्षांनंतर जेव्हा मिसेस वर्ल्डचा किताब भारताच्या नावावर झाला, तेव्हा सरगम कौशल मंचावर भावूक झाली होती. सोशल मीडियावर सरगमचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
मिसेस वर्ल्ड 2022 चं मुकूट परिधान केल्यावर सरगमला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा मिळू लागल्या. अदिती गोवित्रीकर, सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी सरगमचं कौतुक केलं.
‘या प्रवासाचा एक भाग बनल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. 21 वर्षांनंतर भारतात हा किताब परतला. तुला मनापासून शुभेच्छा’, असं अदिती गोवित्रीकरने लिहिलं. 2001 मध्ये अदिती गोवित्रीकरने मिसेस वर्ल्डचा किताब जिंकत भारताची मान उंचावली होती.
कोण आहे सरगम कौशल?
मिसेस वर्ल्डचा किताब जिंकून जगभरात भारताची मान उंचावणारी सरगम कौशल ही मूळची जम्मू-काश्मीरची आहे. ती शिक्षिका आणि मॉडेल आहे. 2018 मध्ये सरगमचं लग्न झालं. लग्नानंतर तिला सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याची फार इच्छा होती.
आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जोरावर अमेरिकेच्या लाग वेगासमध्ये पोहोचलेली सरगम ही मिसेस वर्ल्डचा किताब जिंकूनच भारतात परतली. सरगमने याआधी मिसेस इंडिया 2022 चा किताबही आपल्या नावे केला होता.