J. P. Nadda महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; बारामतीच्या करेक्ट कार्यक्रमासाठी कानमंत्र देणार?

j-p.-nadda-महाराष्ट्राच्या-दौऱ्यावर;-बारामतीच्या-करेक्ट-कार्यक्रमासाठी-कानमंत्र-देणार?

J. P. Nadda Mumbai Tak

चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश अर्थात जे. पी. नड्डा सोमवारी (२ जानेवारी) रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. चंद्रपुरमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता चार्टर्ड विमानाने चंद्रपुरच्या मोरवा विमानतळ इथे नड्डा यांचं आगमन होईल. त्यानंतर चंद्रपूरचं आराध्य दैवत देवी महाकालीचे ते दर्शन घेणार आहेत.

या दौऱ्यात सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर नड्डा यांची जाहीर भव्य सभा होणार आहे. सभेनंतर नड्डा भाजपच्या ‘लोकसभा टीम’ची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते औरंगाबादसाठी रवाना होतील. या दौऱ्यात नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा दौरा :

नड्डा यांच्या या दौऱ्यात भाजपच्या ‘मिशन १४४’ चा अधिकृत नारळ फुटणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. यापूर्वी याच मिशन १४४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा दौरा केला होता. यात त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि भाजपच्या पक्षसंघटनाविषयक मुद्द्यांची हाताळणी केली होती.

काय आहे मिशन १४४?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अद्याप दीड ते दोन वर्षांचा अवकाश आहे. मात्र भाजपने या लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपने २०१९ मध्ये न जिंकू शकलेल्या देशभरातील १४४ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने नियोजन आखले जात आहे. यात महाराष्ट्रातील बारामती, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, शिरुर, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या समावेश आहे.

बारामतीसाठी कानमंत्र मिळणार?

भाजपच्या मिशन १४४ मध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघाची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांचा दौराही पार पडला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती पवार कुटुंबीयांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं सुतोवाच केलं आहे. मात्र यावरुन विरोधी पक्ष नेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी बावनकुळे यांचाच करेक्ट कार्यक्रम करु असा इशारा दिला आहे. त्यामुळे नड्डा यांच्याकडून बारामती मतदारसंघासाठी काही कानमंत्र मिळणार का हे ही पाहवं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *