Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी 11 पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे, 11 डिसेंबर : भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून 11 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी संध्याकाळी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. चंद्रकांत पाटील एका कार्यकर्त्याला भेटून घरातून बाहेर आले आणि त्यावेळी समता दलाच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या तोंडावर शाईफेक केली. पाटील यांच्या सुरक्षेमध्ये असलेल्या पोलिसांचं कडं तोडून दोन्ही कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. या प्रकरणी 11 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी आणि 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
(‘मंत्रिपदाची भीक मागितली हे चालेल का? अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल)
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल. त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण शोशल मीडियावर व्हायरल केले होते.
(हे ही वाचा : शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा)
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जो कोणी शाईफेक करेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चितावणीकर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज बरकडेला दिले जाईल हा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशनला रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.