BMCमध्ये राडा, शिंदे गटाचा शिवसेना कार्यालयावर ताबा, ठाकरे-शिंदे गट भिडला, Video

मुंबई, 28 डिसेंबर : मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ताबा मिळवला. राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना पक्षकार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद पटवत पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्यात आला.
या कार्यालयाचं औपचारिक उद्घाटनही शिंदे गटाकडून करण्यात आलं. या कार्यालयाचं काहीच काळापूर्वी नुतनीकरण झालं होतं. बऱ्याच काळापासून हे कार्यालय बंद होतं. कोरोनानंतर हे कार्यालय उघडलेलं नव्हतं. यानंतर पालिका आयुक्तांची भेट घेऊन शिंदे गटाने या कार्यालयाचा ताबा मिळवला आहे.
शिंदे गटाने मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवल्यानंतर तिकडे ठाकरे गटही पोहोचला. मुंबई महापालिकेत हे दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दोन्ही गटांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, तसंच पदाधिकाऱ्यांची संख्याही आमच्याकडे जास्त आहे, त्यामुळे हे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी शिंदे गटाने आयुक्तांकडे केली. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपलेला आहे. या कार्यालयाच्या बाहेरच्या पाटीवर यशवंत जाधव यांचं नाव झाकून ठेवण्यात आलं होतं. या नावावर लावलेली पट्टी शिंदे गटाने काढून टाकली आहे. यशवंत जाधव यांच्याकडेच हे कार्यालय होतं, पण ते त्यांना मिळत नव्हतं. अखेर त्यांनी या कार्यालयावर ताबा मिळवला आहे.
दरम्यान शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवल्यानंतर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अशापद्धतीने कार्यालयावर कब्जा करणं चुकीचं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या, तर आमच्याकडे संख्या जास्त आहे, त्यामुळे या कार्यालयावर आमचाच दावा असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.