‘

आपल्याला गैरव्यवहारांच्या आरोपात क्लिनचीट मिळाल्यानंतर संजय राऊतांच्या घरात भूकंप होण्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय.

मुंबई : कथित शौचालय घोटाळ्यात खासदार संजय राऊत यांच्या व्याहींनीच आपल्याला क्लिनचीट दिल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. त्यामुळे आता संजय राऊत आपल्या व्याहींवर आरोप करणार का? असं आव्हान किरीट सोमय्यांनी राऊतांना दिलंय. गैरव्यवहारांच्या आरोपात क्लिनचीट मिळाल्यानंतर संजय राऊतांच्या घरात भूकंप होण्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. विशेष म्हणजे शौचालयाच्या कथित घोटाळ्यात खुद्द संजय राऊतांचे व्याही नार्वेकरांनीच आपल्याला क्लिनचीट दिल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. त्यामुळे आता व्याहीच विकले गेल्याचा आरोप राऊत करणार का? असा प्रश्न सोमय्यांनी विचारलाय. यावर आम्ही संजय राऊतांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय.

काही महिन्यांआधी सोमय्यांनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. मात्र त्याच आरोपांतून राजेश नार्वेकरांनी क्लिनचीट दिल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.

राजेश नार्वेकर हे संजय राऊतांचे व्याही असून ते सध्या ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. सोमय्यांच्या दाव्यानुसार पीएमसी बँकेतल्या गैरव्यवहाराच्या आरोपातही त्यांना क्लिनचीट मिळालीय. राऊतांच्या आरोपांच्या व्हिडीओ दाखवून सोमय्यांनी त्यावरुन उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय.

दरम्यान सरकार बदलानंतर ज्या-ज्या नेत्यांना क्लिनचीट मिळाली, त्यात किरीट सोमय्यांचंही नाव लागलंय. सत्ताबदलानंतर सर्वात आधी समीर वानखेडेंना जात पडताडणी समितीनं क्लिन चीट दिली.

वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर धर्माच्या रकान्यात मुस्लिम नोंद असल्याचा आरोप नवाब मलिकांचा होता.

कथित १२३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात भाजपच्या प्रवीण दरेकरांना क्लिनचीट मिळालीय. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपपत्रातून दरेकरांसह इतरांची नाव वगळली आहेत.

10 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपत भाजपचे नेते प्रसाद लाड यांनाही क्लिनचीट मिळालीय. पण लाड यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं सांगत मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दिलाय

किरीट सोमय्यांना कथित पीएमसी बँक घोटाळा, शौचालय घोटाळा आणि आयएनएस विक्रांत या तिन्ही घोटाळ्यांच्या आरोपांतून क्लिनचीट मिळालीय.

याशिवाय प्रवीण दरेकर, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केलीय. त्रिपुरातल्या हिंसाचारानंतर मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी या नेत्यांवर गुन्हे दाखल होते. पण पुराव्याअभांवी त्यांची सुटका करण्यात आली.

किरीट सोमय्यांनीच ज्या भावना गवळींवर आरोप केले होते, त्यांनीही स्वतःच आपल्याला क्लिनचीट मिळाल्याचा दावा केलाय. मात्र ईडी सूत्रांच्या माहितीनुसार गवळींना अद्याप कोणत्याही प्रकरणात क्लिनचीट नाहीय.

मात्र तूर्तास सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊत काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण सोमय्यांचा दावा खरा मानला, तर एका व्याह्यानं आरोप केलेत, आणि दुसऱ्या व्याह्यानं त्याच आरोपांतून सोमय्यांना क्लिनचीट दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *