'24 तासांत हल्ले थांबले नाहीतर…', शरद पवारांचा कर्नाटक सरकारला कडक इशारा

'24-तासांत-हल्ले-थांबले-नाहीतर…',-शरद-पवारांचा-कर्नाटक-सरकारला-कडक-इशारा

मुंबई, 06 डिसेंबर : बेळगावमध्ये 24 तासात हे हल्ले थांबले नाहीतर त्या संयमाला एक वेगळा रस्ता पाहण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि ही जबाबदारी कर्नाटकची मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकारवर असणार आहे, असा इशाराच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. तसंच, गृहमंत्री अमित शहा यांनाही खासदारांनी सांगावे, जर कायदा कुणी हातात घेतला तर याची जबाबदारी केंद्रावर राहिल, असंही शरद पवारांनी ठणकावलं.

कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आता महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला गंभीर इशारा दिला.

‘बेळगावची परिस्थितीत ही गंभीर आहे. महाराष्ट्राकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. जाणीपूर्वक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून विधानं येत आहे. सीमाप्रश्न हा गंभीर आहे. मी सुध्दा आंदोलन केला लाठीचार्जला सुध्दा समोर जावं लागलं. बेळगाव ची स्थिती अतिशय गंभीर आहे असे पत्र मला येतं आहे. मराठी माणसासाठी सतत दहशवादीचे वातावरण तयार केले जात आहे. 19 डिसेंबरला कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन होणार आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर अन्याय करण्याचे काम केले जात आहे. तरी आम्हाला धीर द्यावा असं महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र आहे. ही भूमिका बेळगावातील आहे, अशी माहितीच पवारांनी दिली.

(बेळगावात महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या, फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन)

‘अपेक्षा ही होती की, दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची गरज होती. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. हे चांगलं केलं, पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. विशेषतहा आज महाराष्ट्रातील गाड्यांवर बेळगावात हल्ला झाला आहे’ असा टोलाही पवारांनी फडणवीसांना लगावला.

‘महाराष्ट्राची भूमिका अजूनही संयमाची आहे. तर माझी मनापासून तशी इच्छा आहे. जर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य आणि गाड्यावर हल्ले सुरूच असेल तर देशाच्या ऐक्याला मोठा धोका आहे, अशी भीतीही पवारांनी व्यक्त केली.

(ज्यांना भरभरून दिले त्यांनीच कोकणावर अन्याय केला, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा)

उद्यापासून संसदेत अधिवेशन सुरू होत आहे, आम्ही महाराष्ट्रातील खासदारांना विनंती करतोय की, गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर विषय घालावा, जर तरीही परिस्थिती सुधारत नसेल आणि कुणी कायदा हातात घेत असेल तर याची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारला घ्यावी लागणार आहे, असा इशाराही शरद पवारांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *