Home » महाराष्ट्र » स्वदेशी उत्पादने खरेदी केल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटेल

स्वदेशी उत्पादने खरेदी केल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटेल

स्वदेशी-उत्पादने-खरेदी-केल्यास-बेरोजगारीचा-प्रश्न-सुटेल

सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताला निष्क्रिय राहून चालणार नसून, स्वावलंबी व्हावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत; गुजरातमधील मोरबी येथे १०८ फुटी हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना

अहमदाबाद : सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताला निष्क्रिय राहून चालणार नसून, स्वावलंबी व्हावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले. हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुजरातमधील मोरबी येथील १०८ फूट हनुमानाच्या मूर्तीची दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रतिष्ठापना करताना मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, की आगामी २५ वर्षे स्वदेशी उत्पादने खरेदी करून, त्यांचा वापर जर नागरिकांनी सुरू केला तर देशातील बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. आपण जागृत असो व निद्रिस्त आपल्याला आहे त्या स्थितीत राहणे परवडणारे नाही. जागतिक स्तराचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की संपूर्ण जगभर ‘आत्मनिर्भर’ कसे होता येईल, याचा बहुतांश देश विचार करत आहेत. या देशातील साधू-संतांनी आपल्या अनुयायांवर स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचा संस्कार करावा, असे आवाहन करून मोदी म्हणाले, की ‘व्होकल फॉर लोकल’ हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

 दिल्लीत हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीदरम्यान हिंसाचार

दिल्लीच्या जहाँगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली, तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. ‘ही पारंपरिक मिरवणूक होती आणि पोलीस पथक तिच्यासोबत होते. मात्र ती कुशल चित्रपटगृहाजवळ पोहोचल्यानंतर दोन समुदायांत संघर्ष झाला. हा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले’, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिला. परिस्थिती आता नियंत्रणात असून, जहाँगीरपुरीसह इतर संवेदनशील भागांत जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पनवेलमध्ये हनुमान मंदिरात शिवसेनेतर्फे इफ्तार पार्टी

पनवेल : राज्यात सर्वत्र मशिदींवरील भोंग्यांवरून वातावरण तापलेले असताना शिवसेनेने कळंबोली येथे शनिवारी हनुमान जयंतीच्या मंडपात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नवी मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि मुस्लीम नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर या मारुती मंदिरात सायंकाळची आरती मुस्लीम नागरिकांनी केली. कळंबोलीतील लोखंड बाजाराच्या मुख्य रस्त्यावरील मारुती मंदिरात हा उपक्रम शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, अ‍ॅड्. श्रीनिवास क्षीरसागर यांनी आयोजित केला होता. मारुती मंदिराच्या आवारात दुपारी भंडारा झाल्यावर सायंकाळी ७ वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. लोखंड बाजारातील व्यावसायिक सय्यद हवालदार आणि फारुक हाजी यांनी येथे हजेरी लावली.

Web Title: Buying indigenous products solve problem unemployment prime minister narendra modi opinion ysh

Leave a Reply

Your email address will not be published.