'राजकीय भूमिकेमुळे…'किरण माने प्रकणावर डॉ. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

मुंबई, 15 जानेवारी- ‘मुलगी झाली हो’ (Mulgi zali Ho) मालिकेतली अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून काढून टाकल्या नंतर एकच खळबळ माजली आहे. त्यांना राजकीय भूमिकेमुळे काढून टाकल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनतर सर्वच स्थरातून याचा निषेध केला जात आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते अमोल कोल्हे हे नेहमीच विविध विषयांवर आपलं ठाम मत देताना दिसतात. ते एक उत्तम अभिनेता तर आहेतच शिवाय ते एक लोकप्रिय राजकीय नेतेसुद्धा बनले आहेत. त्यांनी मालिकांमध्ये काम करता करता आपला मोर्चा राजकरणकडे वळवला आहे. ते या दोन्ही क्षेत्रात तितक्याच ताकतीने सक्रिय आहेत. त्यांनी काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील एक फोटो आणि एक राजकीय क्षेत्रातील फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये विचारलं आहे, ‘राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?’ यावरून हेच स्पष्ट होतं त्यांनी किरण मानेंना आपला पाठिंबा दिला आहे.
तर दुसरीकडे मराठी सीरियल्सच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगितलं आहे, की डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत काय म्हटलं आहे. यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे, ‘मला हा विषय महत्वाचा वाटतो. अशा पद्धतीनं खरंच होतं का? समाजमाध्यमांवर राजकीय भूमिका घेतल्यास कलाकरांना मालिकांमधून काढलं जातं का? हे मला सांगायचं आहे. जी गोष्ट मला पटत नाही त्याबद्दल मी सातत्यानं सांगत आलो आहे. मात्र मला अशा प्रकराचा अनुभव कधीच आलेला नाही’.
ते पुढं म्हणाले, ‘मी देखील एका वाहिनीसाठी मालिका करत होतो. त्यात कधीही आडकाठी कुणीही केली नाही. वेगवेगळ्या वाहिन्यांवर मी काम केलं, कोणत्याही वाहिनींकडून मला अशा प्रकारचं वर्तन केलं जात नाही. असं मला तरी दिसून आलेलं नाही. असं म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं मत मांडलं आहे. (हे वाचा:‘मुलगी झाली हो’ चं नवीन पोस्टर आलं समोर, पोस्टरमधून किरण मानेंना वगळलं) स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेते किरण माने महत्वाची भूमिका साकारत होते. या मालिकेत ते विलास पाटीलच्या भूमिकेत दिसत होते. यांनी मुख्य पात्र असणाऱ्या साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. प्रेक्षक त्यांना पसंत करत होते. त्यांच्या दमदार अभिनयाचं सतत कौतुकही होत असे. परंतु त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.