'हे सर्व पुरस्कार शेवटी…' त्या नामांकनानंतर अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत

मुंबई, 16 डिसेंबर : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अवधूत गुप्ते त्याच्या चाबूक अंदाजासाठी बराच प्रसिद्ध आहे. जिंकलंस मित्रा, तोडलंस मित्रा असं म्हणून त्याने आजपर्यंत अनेकांना दाद आणि शाबासकी दिली आहे. अवधूत त्याच्या बिनधास्त अंदाजाने प्रेक्षकांचं मन कायमच जिंकत असतो.अवधूत गुप्ते हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच अवधूतने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
अवधूत गुप्ते आपल्या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावतो. त्याच्या गाण्यांवर अबालवृद्ध सगळे थिरकतात. असंच त्याच्या एका गाण्याने मध्यंतरी धुमाकूळ घातला होता. हे गाणं म्हणजे पांडू चित्रपटातील ‘बुरुम- बुरुम’ हे आहे. आता या गाण्याला नामांकनं मिळाल्याच्या निमित्ताने अवधूत गुप्तेने खास पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय कि, ‘खरंतर ज्या दिवशी एखादा संगीतकार त्याचे गीत गाण्यासाठी मला बोलवतो आणि मी रियाज करून तयारी करून स्टुडिओमध्ये जातो, त्यावेळेस होणारा आनंद हा सर्वात मोठा पुरस्कार असतो. तरी देखील मधे मधे अशा प्रकारची नामांकने ही हुरुप वाढवणारी असतात.’
हेही वाचा – Gandhi Godse Ek Yudh: शाहरुखच्या ‘पठाण’ ला ‘गांधी गोडसे एक युद्ध’ देणार बॉक्स ऑफिसवर टक्कर
पुढे त्याने लिहिलंय कि, ‘सर्व नामांकनांसाठी मी झी टॉकीज चे आभार मानतो. पांडू सारख्या न भूतो न भविष्यती विषयावरील चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी दिग्दर्शक विजू माने, झी स्टुडिओझचे श्री अश्विन पाटील आणि श्री मंगेश कुलकर्णी यांचे मनापासून आभार मानतो. ‘सूर नवा ध्यास नवा‘ च्या मंचावर सापडलेला हिरा म्हणजे संपदा माने. तिने तिच्या चित्रपट कारकिर्दीच्या पहिल्याच गाण्यात षटकार मारला आहे. यंदाच्या वर्षी तिच्या घरी पुरस्कार ठेवण्यासाठी नवीन कपाट बनवावे लागणार हे नक्की! तिचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि तिला आशीर्वाद! ऐका दाजीबा पासून भुरुम भुरुम पर्यंत मला साथ देणाऱ्या सखी वैशालीचे सुद्धा खूप खूप आभार ! पांडू च्या संघातील एक सदस्य म्हणून पांडूच्या नामांकने घोषित झालेल्या विजू माने, भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी आणि इतर कलाकारांचे देखील अभिनंदन!!’
‘बाकी नामांकनांमध्ये आता स्पर्धक म्हणून घोषित झालेले गायक आणि संगीतकार हे मला भावंडांसारखे आहेत. मराठी चित्रपट सृष्टी नावाच्या एका मोठ्या कुटुंबाचे आम्ही सदस्य आहोत. त्यामुळे ह्यापुढे जाऊन पुरस्कार ह्यांपैकी कोणालाही मिळाला तरी देखील तो मला मिळाल्यासारखाच आहे. कारण, कलेत स्पर्धा होऊ शकत नाही. कुठलीही कलाकृती ही दुसऱ्या कलाकृती पेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असूच शकत नाही. परीक्षकांच्या निवडीवर बेतलेले पुरस्कार हे व्यक्तीसापेक्ष तर लोकांच्या मतांवरती बेतलेले पुरस्कार हे समूह सापेक्ष असतात. कारण, मत न दिलेला एक मोठा समूह असतोच की. म्हणून, हे सर्व पुरस्कार, शेवटी आम्ही सर्व कलाकार एकत्रित येऊन मायबाप रसिकांची जी सेवा करीत आहोत त्याची मिळालेली पावतीच आहे, असं मी मानतो. पुनश्च धन्यवाद!’
अवधूत गुप्तेची ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतीये. त्याने या पोस्टद्वारे मांडलेलं मत चाहत्यांना पटलं आहे. त्यांनी या पोस्टवर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.