आदित्य ठाकरे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जे स्वतःच्या घरात निष्ठावंत नाहीत, नसतात त्यांच्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करता येत नाही. खा. राहुल शेवाळे यांचे खूप सारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियात फिरत आहेत. ते कसले आहेत, याची सर्वांना कल्पना आहे. त्यांनी स्वतःच्या घरातच तीनवेळा गद्दारी केली आहे. त्यांचे लग्न वाचविण्यासाठी आमच्या ठाकरे घराण्याने किती प्रयत्न केले, ते कसे वाचविले, याची मला कल्पना आहे; पण मी कोणाच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलणार नाही. ते आमचे चारित्र्य नाही. असल्या लोकांपासून आम्ही लांब राहतो, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) नेते, आ. आदित्य ठाकरे यांनी खा. शेवाळे यांना चोख उत्तर दिले.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत आदित्य ठाकरे यांच्यावर काही आरोप केले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘ए.यू.’ नावाने 44 वेळा फोन आले. या ‘ए.यू.’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा दावा त्यांनी केला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना सामोरे जात, ‘लव्ह यू मोअर’ या शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली. शेवाळे यांनी ज्या प्रकारचे आरोप केले त्या घाणीत मला उतरायचे नाही. त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही, असे आदित्य म्हणाले. राहुल शेवाळे यांचे मन काळे असल्याचे सांगून, आदित्य ठाकरे म्हणाले की, अशाप्रकारची घाण लांब गेली याचा आनंद आहे. आमचे चारित्र्य यांच्यासारखे नाही. अशा गोष्टींपासून आम्ही खूप लांब राहतो.

राज्यात ‘एनआयटी’चा घोटाळा उघड झाला. राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यांना पदमुक्त केले जात नाही. उद्योग जात आहेत. या सर्व प्रकरणातून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारचे घाणेरडे आरोप केले जात आहेत; पण त्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. आमचे काम करत राहू, असे ते म्हणाले.

अधिक वाचा :

  • कर्नाटकचे पाणी उन्हाळ्यात तोडणार; सीमा प्रश्न समन्वयमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा
  • रस्ते, इमारतींसाठी कोल्हापूर जिल्ह्यास १३५ कोटी रुपयांचा निधी
  • New Education Policy 2022 : दहावीऐवजी आता बारावी बोर्ड; ४ वर्षे पदवीमुळे माध्यमिकचा शेवटचा टप्पा ११ वी