सोहैल खानच्या एक्स-वाइफचा नशेत तोल डगमगला; ट्रोलिंगनंतर

Seema Sajdeh
Image Credit source: Instagram
मुंबई: अभिनेत्री मलायका अरोराच्या ‘मूव्हींग इन विथ मलायका’ या शोमध्ये अभिनेता सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेहने हजेरी लावली. या शोमध्ये सीमाने तिच्या व्हायरल व्हिडीओवर अखेर मौन सोडलं. करण जोहरच्या पार्टीतील सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. कारण या व्हिडीओत दारुच्या नशेत असलेल्या सीमाचा पापाराझींसमोर तोल डगमगल्याचं पहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुलगा निर्वाण खानचीही प्रतिक्रिया काय होती, हेसुद्धा तिने सांगितलं.
नेमकं काय घडलं होतं?
करण जोहरच्या पार्टीतील हा व्हिडीओ होता. या पार्टीदरम्यान फोनवर बोलण्यासाठी सीमा बाहेर गेटजवळ आली होती. त्याचवेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला. पापाराझींसमोर सीमाचा तोल डगमगला आणि नंतर भिंतीचा आधार घेऊन ती उभी राहिल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय. मात्र ज्याप्रकारे ती डगमगली आणि त्यानंतर तिचा बोलण्याचा अंदाज पाहून ‘ती खूप जास्त दारू प्यायली की काय’ असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला होता.
सीमाच्या मुलाची प्रतिक्रिया
“तो व्हिडीओ पाहिल्यानंतर निर्वाणने (मुलाने) मला कॉल केला. त्यावेळी तो त्या व्हिडीओबद्दल काही बोलला नाही, मात्र हे काय कपडे घातलेस, असं तो म्हणाला होता. त्या संपूर्ण व्हिडीओबद्दल तुला हेच बोलायचं होतं का, असा प्रश्न मला तेव्हा पडलेला. पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, त्यानंतर दोन दिवस मी जणू नर्कात होते”, असं सीमाने सांगितलं.
यावेळी सीमाने ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर दिलं. “सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे, मी काहीच नाकारत नाही. प्रत्येकजण ती गोष्ट करतो, पण फक्त मीच मूर्ख होती, जी त्या अवस्थेत कोणाचाच विचार न करता बाहेर गेले. त्याआधी दहा आठवडे मी बेडवर पडून होते”, असं सीमा म्हणाली.
हे ऐकताच मलायका तिला म्हणते, “तू फक्त त्या क्षणी एंजॉय करत होतीस, पण लोक त्या दृष्टीने याकडे पाहणार नाहीत. का? महिलांना बाहेर जाण्याची, दारु पिण्याची आणि मजा करण्याची परवानगी नाही का? ती चारित्र्यहीनच आहे, नशेत तिचा तोल डगमगला, अशी टीका लोकांनी केली. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याबद्दल का मतं बनवली जातात?”
याविषयी पुढे सीमा ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत म्हणते, “खरंतर मी त्या सर्व मतांसाठी आभारी आहे, कारण त्यामुळेच मी धीट झाले आहे. तुम्ही एकदा त्यावर प्रतिक्रिया देणार, दोनदा देणार, पण नंतर तुम्हीच म्हणणार की जाऊ द्या.. कारण ट्रोल करणाऱ्या लोकांना चेहरा नसतो, नाव नसतो. मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही हे पुन्हा पाहणार. प्रत्येकजण सध्या परीक्षक आणि ज्युरी बनला आहे.”
सोहैल खान आणि सीमा यांची पहिली भेट ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला सीमा आणि सोहैलने घटस्फोटासाठी अर्ज केला. तब्बल 24 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.