सुरेश जैन यांच्यासाठी जळगावमध्ये 'रेड कार्पेट'; आगामी राजकीय वाटचालीबाबत केलं मोठं भाष्य

सुरेश-जैन-यांच्यासाठी-जळगावमध्ये-'रेड-कार्पेट';-आगामी-राजकीय-वाटचालीबाबत-केलं-मोठं-भाष्य

जळगाव : तब्बल ४० वर्ष जळगावच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व गाजवलेले आणि घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले माजी मंत्री सुरेश जैन यांचं बुधवारी रात्री जळगावमध्ये मोठ्या उत्साहात आणि वाजतगाजत स्वागत झालं. शेकडो कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात आणि रेड कार्पेट अंथरुन जळगाव रेल्वे स्टेशनवर जैन यांचं स्वागत केलं. दरम्यान, जवळपास १० वर्षांनंतर जळवागमध्ये परतल्यानंतर त्यांनी त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठं भाष्य केलं.

कर्मभूमीत आल्याचा आनंद; स्वागतानं भारावून गेलो :

यावेळी बोलताना सुरेश जैन म्हणाले, मला प्रचंड आनंद झाला. माझ्या कर्मभूमीत आलो, माझ्या लोकांमध्ये आलो, माझ्या गावी आलो. मला अतिशय आनंद आहे. फार मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. जळगावमध्ये मी ९ निवडणुका लढलो आणि या ९ निवडणुकांमध्ये लोकांनी मला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करुन दिलं आहे. त्यामुळे मी या प्रेमाचा आयुष्यभर ऋणी राहील.

राजकीय वाटचालीबाबत काय म्हणाले जैन?

आगामी राजकीय वाटचालीबाबत विचारलं असता सुरेश जैन म्हणाले, मी अद्याप काहीच विचार केला नाही. परंतु माझा विचार आहे की मी आता ८० व्या वर्षात आलो आहे. मी जवळगावची ४० ते ४५ वर्षे सेवा केलेली आहे. त्यामुळे आता माझा स्वतःचा, घरच्यांचा आणि मित्रमंडळींचाही सल्ला आहे की आपण आता सल्लागाराच्या भूमिकेत राहायला हवं.

सल्ल्यासाठी जो कोणी आपल्याकडे येईल मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला आपला सल्ला पाहिजे असेल, आपला आशीर्वाद पाहिजे असेल तर राजकीय नाही पण सामाजिक असेल किंवा अन्य विषयाबाबत असेल, पण त्यांना मला मदत करता येत असेल तर ती मदत करण्याचा निश्चित रूपाने प्रयत्न करेल. परंतु राजकीय दृष्ट्या सक्रिय राहण्याचा माझा अजिबात विचार नाही.

मेंटॉर म्हणून काम करणार सुरेज जैन :

मी परत राजकारणात यावं, रस्ते चांगले करावे, ही जळगावकरांची इच्छा आहे, परंतु आता माझे किती सहकारी तिथं आहेत आणि किती नाहीत, नवीन टीम सबंध तयार करण्याच्या संदर्भातली भूमिका हे सबंध आता मला या वयात किती शक्य होईल हे माहित नाही, त्यामुळे मी असं ठरवलं की ज्याला ज्याला आपला आशीर्वाद पाहिजे, सल्ला पाहिजे, एक मेंटॉर म्हणून काम करु.

जळगावमधील २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांना १० मार्च २०१२ साली अटक करण्यात आली होती. अटकेनंतर हा खटला सुनावणीला असताना जैन तब्बल साडेचार वर्षे धुळे येथील तुरुंगात होते. यादरम्यान, २ सप्टेंबर २०१६ मध्ये जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र त्यात मुंबई येथेच थांबण्याची अट घालण्यात आली होती. याविरोधात जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन जैन यांना न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी नियमित जामीन मंजूर केला. त्यानंतर आता ते जळगावमध्ये परतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *