शिवसेना भवन ताब्यात घेणार का? शिंदे गटाचे भरतशेठ म्हणाले, आमच्या डोक्यात, मनात…

शिंदे गटाने रक्तांतर केलं काय? या संजय राऊत यांच्या सवालाचा त्यांनी समाचार घेतला. ते राष्ट्रवादीच्या रक्तांतरात गेले आहेत. राऊत आव आणत असतात. सर्व खबरी आणि टीप ते शरद पवारांना देतात.
शिवसेना भवन ताब्यात घेणार का? शिंदे गटाचे भरतशेठ म्हणाले, आमच्या डोक्यात, मनात…
Image Credit source: tv9 marathi
नागपूर: मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. एका बापाचे असतील तर येऊनच दाखवा, असं आव्हानच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना भवन ताब्यात घेण्याचं आमच्या डोक्यात नाही. आमचा तसा प्रयत्नही नसल्याचं सांगून या वादाला पूर्णविराम दिला आहे.
दादरचं शिवसेना भवन ताब्यात घेण्याचं आमच्या डोक्यात नाही. विचारात नाही आणि मनातही नाही. आम्ही कधी तो विषयही काढला नाही. आमच्या बैठकीत ठरलंय की दुसरं कार्यालय तयार करायचं. आमच्या बैठकीत कधी शिवसेना भवनचा विषय निघत नाही. आम्ही कधीच त्यावर ब्र शब्दही काढला नाही. आमच्या कुणाच्या तोंडून शिवसेना भवनावर दावा करण्याचं विधान निघालं असेल तर सांगा, असं आव्हानच भरतशेठ गोगावले यांनी दिलं.
आमच्या बापांमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही तयार झालो. आमच्या बापांपर्यंत जाऊ नका. खऱ्या बापाचे होतो म्हणून तुम्हाला हिसका दाखवला. आमच्या नादी कुणी लागू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाद तर कोणी करायचाच नाही, असा इशारा गोगावले यांनी दिला.
कुत्रा भुंकतो. तो कधी कुणाला चावत नाही. भूंकणारा कुत्रा चावत नाही आणि गरजणारा पडत नाही. त्यांना किती गांभीर्याने घ्यायचं ते पाहा. त्यांना रोज मसाला लागतो. त्यामुळे त्यांनी शिवसेना भवनाची नवीन टूम काढली असेल. ती दोन दिवसात बंद पडेल, असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला.
शिंदे गटाने रक्तांतर केलं काय? या संजय राऊत यांच्या सवालाचा त्यांनी समाचार घेतला. ते राष्ट्रवादीच्या रक्तांतरात गेले आहेत. राऊत आव आणत असतात. सर्व खबरी आणि टीप ते शरद पवारांना देतात. ते शरद पवार यांच्या सल्ल्याने चालतात. ते उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने चालत नाहीत. म्हणून तर त्यांनी आकांडतांडव केलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
बॉम्बस्फोट करतो म्हणालो. त्यावर उदय सामंत यांनी उत्तर दिलं. बॉम्बशोधक पथक तयार आहे. तुम्ही या, असं आव्हानच सामंत यांनी दिलं होतं. पण राऊतांनी काही बॉम्ब फोडलाच नाही.
त्यांचा बॉम्ब गोठला की त्यात दारुगोळा नव्हता ते काही माहीत नाही. म्हणून राऊतांकडे फार कोणी लक्ष देत नाहीये. लोकांना कळून चुकलं आहे की ते कमकुवत होत चालले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
शिंदे गटाने संघाची हाफ पँट घालावी या राऊतांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. संघाची हाफ पँट आणि काळी टोपी बदलली आहे. संघ आता फूल पँटवर आला आहे. संघाने तो ड्रेस बदलला आहे. राऊतांना कदाचित माहीत नसेल.
संघ कार्यालयात जायला काही अडचणी नाहीत. तिथे गेलो म्हणजे त्यांचे झालो असं नाही. त्यांना बोलायचं ते बोलू द्या. आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ, असंही ते म्हणाले.