कवठेमहांकाळ – विद्याधर रास्ते.
दि मिरज एज्युकेशन सोसायटीच्या ज्युबिली कन्या शाळा, ज्युबिली ज्युनिअर कॉलेज, एम. ई. एस इंग्लिश मिडीयम स्कूल, नूतन बाल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त मिरज येथील भानू तालमीच्या भव्य पटांगणावर सामुदायिक सूर्य नमस्कार घालणेत आले. संस्थेचे कार्यवाह संजय धामणगावकर, कोषाध्यक्ष ए. के. देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका विनया पाठक, उपमुख्याध्यापक दयानंद लांडगे, पर्यवेक्षिका सौ मंजिरी सोपल, एम ई एस च्या मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी देशपांडे, नुतन बालच्या मानसी केळकर, सौ देविका चिप्पलकट्टी, यांचेसह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता ५वी ते १२वी पर्यतचे शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी झाले होते. सकाळच्या प्रहरी चैतन्य मय वातावरणात सूर्य देवास सामोरे ठेवून स्फुर्तिदायक गीताच्या व संगीताच्या तालावर १२ सूर्य नमस्कार घालणेत आले.
या उपक्रमासाठी गेले महिनाभर सूर्य नमस्कार शास्त्रोक्त व शिस्तबध्द पध्दतीने घालता यावेत यासाठी विद्यार्थी व शिक्षकांचा सराव सुरू होता. यासाठी सर्व वर्गांचे वर्गशिक्षक, कार्यवाह संजय धामणगावकर, मुख्याध्यापिका विनया पाठक, उपमुख्याध्यापक दयानंद लांडगे, पर्यवेक्षिका मंजिरी सोपल, क्रीडा शिक्षक जयपाल सदामते, दत्तात्रय सूर्यवंशी, एम ई एस च्या मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी देशपांडे, क्रिडा शिक्षिका सारीका रांजणे, काॅलेजच्या क्रिडा शिक्षिका पौर्णिमा स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी व शिक्षक यांचा फिटनेस वाढावा यादृष्टीने कोरोना कालखंडातील सप्टेंबर पासून आजतागायत ऑनलाईन च्या माध्यमातून सुक्ष्म योग व आनापान ध्यान साधनाचे प्रात्यक्षिक शेकडो विद्यार्थी, पालक व शिक्षक करीत आहेत. हा उपक्रम केवळ शिवजयंती पुरते न करता कायमस्वरूपी सुरू ठेवणार असून इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संजय धामणगावकर यांनी याप्रसंगी बोलताना केले.
मैदानाचे पूजन कोषाध्यक्ष ए के देशपांडे यांनी केले. संयोजन क्रीडा विभागाच्या सौ मंजिरी सोपल, दत्तात्रय सूर्यवंशी, जयपाल सदामते व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ हर्षदा बेडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सदरचा सामुदायिक सूर्य नमस्कार उपक्रम सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियमांचे पालन करीत संपन्न झाला. संस्थेच्या सर्व शाळांचे सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
शेवटी आभार मुख्याध्यापिका विनया पाठक यांनी मानले.