शिरसाटांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले तुम्ही उद्या विधानसभेत असाल की

नवी मुंबई, 25 डिसेंबर : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. “संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि ते शिवसेना पक्ष कसा संपेल याची पद्धतशीर मांडणी करत आहेत,” असा आरोप संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केला होता. या टीकेवर संजय राऊत यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे. नवी मुंबईतील शाखा उद्घाटन करण्यासाठी आले असता संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले संयज राऊत?
मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज्याच्या अनेक प्रमुख नेत्याचे आशीर्वाद लाभले आहेत. पण माझी निष्ठा कायम बाळासाहेब आणि शिवसेनेसोबत राहिली आहे. शरद पवार यांच्यावर बोलताना विचार करायला हवा. संजय शिरसाट उद्या विधानसभेत असतील की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे. आम्ही विक्रमवीर आहोत आणि इकडचा सामना आम्हीच जिंकणार असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील : शिरसाट
संजय शिरसाट म्हणाले, “शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे चालवतच नाहीत. ते राष्ट्रवादी चालवत आहे आणि संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. माध्यमांनी ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत हा गैरसमज डोक्यातून काढावा. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि शिवसेना पक्ष कसा संपेल याची पद्धतशीर मांडणी ते करत आहेत.” “जेव्हा शिवसेना संपेल, तेव्हा संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील,” असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांवर टीका केली.
वाचा – जे पराक्रम केले ते भोगावेच लागणार; राऊतांना गिरीश महाजनांनी पुन्हा डिवचलं
भाजपा आणि शिंदे गटाने दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एयू या कोडचा उल्लेख करत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटमध्ये असलेल्या ईएस (EU) कोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. आता या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं.
“अडीच वर्षात ईएस कोण याची चौकशी करायला पाहिजे होती”
ते म्हणाले, “खासदार विनायक राऊत किंवा खासदार संजय राऊत यांना रोज एक विषय पाहिजे असतो. यांना पक्षाचं काहीच देणंघेणं नाही. त्यांचा पक्ष संपत चालला आहे याची त्यांना चिंता नाही. त्यांना आरोप करण्यात रस आहे. ते अडीच वर्षे सत्तेत होते. या अडीच वर्षाच्या काळात ईएस कोण, डीएस कोण किंवा आणखी कोण याबद्दल त्यांनीच चौकशी करायला पाहिजे होती. एकनाथ शिंदे यांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.