शिंदे सरकार कधीपर्यंत टिकणार? राऊतांनी महामोर्चात डेडलाईनच सांगून टाकली

मुंबई, 17 डिसेंबर : आज महाविकास आघाडीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ते महाराष्ट्र , कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आमच्या ताब्यात द्या असं राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं संजय राऊत यांनी?
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चात बोलताना शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज महाराष्ट्र पेटून उठला आहे. आज दिल्ली राज्याची ताकद बघत असेल, आजचा मोर्चा म्हणजे सरकार उलथून टाकरण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. मोर्चाला सरकारने इशारा दिला असून, फेब्रुवारीत तुम्हाला हे सरकार दिसणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा : ‘त्यांच्या’ छाताडावर चालण्याची वेळ आलीये, …तोपर्यंत शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा शब्द
उद्धव ठाकरेंचा निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत बेळगाव महाराष्ट्रात येणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मी राज्यपाल मानत नाही. त्या पदावर कोणीही बसायचं आणि टपली मारून जायचं हे चालणार नाही. राज्यपालांना हटवण्यासाठीच हा मोर्चा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या मोर्चाला महाविकास आघाडीमधील जवळपास सर्वच नेत्यांची उपस्थिती होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.