शाहरुख खानचा लेक अखेर वडिलांचं 'हे' स्वप्न पूर्ण करणार; फोटो शेअर करत म्हणाला…

मुंबई, o7 डिसेंबर : बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलीवूडमध्ये कधी पदार्पण करणार, असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात होता. मध्यंतरी आर्यन सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण आर्यन खानने आता त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट टाकून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आर्यन खान आता चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
होय, जे मोठ्या पडद्यावर आर्यनच्या पदार्पणाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी खुद्द स्टार किडने खुशखबर दिली आहे. आर्यनने त्याच्या इंस्टा वर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एका चित्रपटाची स्क्रिप्ट दिसत आहे आणि त्या स्क्रिप्टवर आर्यनचे नाव लिहिले आहे. यासोबतच रेड चिलीज एंटरटेनमेंटचे नावही फोटोत दिसत आहे.
हेही वाचा – Swara Bhasker: स्वरा भास्करला बॉलिवूडमध्ये मिळत नाहीये काम; स्वतःच सांगितलं कारण
हा फोटो शेअर करत आर्यनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘लेखन काम पूर्ण झालं आहे..आता शूटिंगसाठी प्रतीक्षा करू शकत नाही”. या सिनेमाची निर्मिती शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण्यात येणार आहे. त्याच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की तो एका अॅक्शन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि त्याची स्क्रिप्ट आता पूर्ण झाली आहे. आर्यनने त्याचा हा फोटो शेअर करताच तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
पण विशेष बाब म्हणजे आर्यन अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय स्टार किडने अभिनयापेक्षा ‘दिग्दर्शक’ होण्याला पसंती दर्शवल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आता आर्यन अभिनेता म्हणून नाही तर एक दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आर्यन खान नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. पुढच्या वर्षात ही वेब-सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. तर दुसरीकडे शाहरुखची लेक सुहाना जोया अख्तरच्या आगामी ‘द आर्चीज’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमादेखील नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
आर्यनने शेअर केलेल्या पोस्टवर शाहरुखची कमेंट लक्षवेधी ठरत आहे. शाहरुखने लिहिलं आहे,”वाह..विचार केला..विश्वास ठेवला आणि आता अखेर स्वप्न पूर्ण होत आहे. पहिला प्रोजेक्ट नेहमीच खास असतो. तुला पहिल्या सिनेमासाठी खूप शुभेच्छा”. तर गौरी खानने ‘आता सिनेमाची प्रतीक्षा’ अशी कमेंट केली आहे. आर्यन खानने केलेल्या या घोषणेमुळे त्याचे चाहते सध्या प्रचंड उत्सुक आहेत. आता आर्यन खान दिग्दर्शकाच्या भूमिकेला कितपत वाव देऊ शकेल ते येणाऱ्या काळातच समजेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.