'शाब्बास रे माझ्या गब्रू! जे काम औरंगजेब, अफझल खानास जमले नाही, ते…', ठाकरेंची शिंदेंवर तोफ

'शाब्बास-रे-माझ्या-गब्रू!-जे-काम-औरंगजेब,-अफझल-खानास-जमले-नाही,-ते…',-ठाकरेंची-शिंदेंवर-तोफ

समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाठ थोपटली. पंतप्रधानांनी दिलेल्या शाबासकीचे वेगवेगळे अर्थ काढत उद्धव ठाकरेंनी तोफ डागलीये.

उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलंय की, ‘लोकार्पण सोहळ्याच्या वेळी म्हणे पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्याजवळ खेचले व पाठीवर थाप मारली व त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्यासमोर ओशाळवाण्या चेहऱ्याने हात जोडून उभे राहिल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले. मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली म्हणजे जी काही शाब्बासकी दिली ती कशासाठी? तर ‘शाब्बास! जे काम औरंगजेब, अफझल खानास जमले नाही, ते शिवसेना फोडण्याचे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केलेत. शाब्बास रे माझ्या गब्रू!’ शाब्बासकी असेल ती यासाठीच.”

“राज्यात सतत सुरू असलेल्या शिवरायांच्या अपमानाचे काय, शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना कधी हटवताय, असे स्वाभिमानी प्रश्न पंतप्रधानांना विचारण्याची हिंमत मिंधे मुख्यमंत्र्यांमध्ये नसल्यामुळेच पंतप्रधानांनी त्यांना शाब्बासकी दिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोजच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. त्या अपमानावर केंद्राकडे आवाज उठविण्याची हिंमत न दाखवल्यामुळेच पंतप्रधानांनी नागपूरच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारलेली दिसते. शाब्बास, शाब्बास, मुख्यमंत्री शाब्बास!”, असे खडेबोल ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि मोदींना सुनावलेत.

“मुंबईतील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून त्यांच्या ‘निर्भया’ योजनेतील पोलीस वाहने खोकेबाज बेइमान आमदारांच्या सुरक्षेसाठी लावल्याबद्दल तर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना जवळ खेचून शाब्बासकी दिली नसेल ना? महिलांना सुरक्षा नाही व गद्दार आमदारांच्या मागे-पुढे पोलिसी लवाजमा. यालाच म्हणतात- ‘‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या!’’ आपल्या देशाची अर्थव्यवस्था याच पायावर उभी आहे”, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलंय.

ठाणे महापालिकेच्या कारभारावर ठाकरेंचं बोट

ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलंय की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांच्या बाजूलाच बसले होते. त्यांनीच आतापर्यंत चालवलेल्या ‘ठाणे’ वगैरे महानगरपालिकेचे ऑडिट केले तर ‘खर्च रुपयाचा व उत्पन्न आठ आण्याचे’ याचा खरा अर्थ सहज समजेल. ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत म्हणे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतपतही पैसे नाहीत. हे असे का झाले? इथे रुपय्या-अठन्नी वगैरेंचे घोळ आहेत काय त्याचाही शोध घ्यावा लागेल”, असा सल्ला ठाकरेंनी मोदींना दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *