शरद पवार मोदी-शाहंना भेटणार! अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर कोणत्या विषयावर खलबत?

(Anil Deshmukh Bail)
पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. जवळपास एक वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून ते तुरुंगात होते. देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, असे बडे नेते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहचले होते.
तर त्याचवेळी शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी अनिल देशमुख यांच्या अटक आणि सुटकेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सत्तेचा कसा गैरवापर होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. न्यायालयाने दिलेला निकाल अनिल देशमुख आणि अन्य सहकाऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी देण्यासाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त ठरेल ही अपेक्षा आहे.
न्यायालयाने निकाल देताना स्वच्छ म्हटलं की यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. आधी १०० कोटींचा आरोप करण्यात आला, चार्जशीटमधे ही रक्कम साडेचार कोटी दाखवण्यात आली आणि फायनल चार्जशीटमधे तरं ही रक्कम एक कोटी दाखवण्यात आली. कोर्टाने म्हटलं की एका सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान नेत्याला १३ महिने चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलं. न्यायपालिकेने न्याय दिला याचं समाधान आहे, असंही पवार म्हणाले.
पण आपल्या सहकाऱ्यांना खूप यातना सोसाव्या लागल्या, अशी खंत व्यक्त करत अशा यातना भविष्यात इतर कोणावर सोसण्याची वेळ येऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याच यावेळी पवार यांनी नमूद केलं. संसदेतील वरिष्ठ सहकाऱ्यांसह मी गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याचा पुनर्विचार करण्याची किंवा बदल करण्याची मागणी होत आहे. पण आम्ही ही मागणी करत नाही. आम्ही संसदेत आहोत. त्यामुळे आम्ही संसदेत चर्चा करु. आणखी काही संसदेतील सहकाऱ्यांना घेऊन त्यासंबंधी काही योजना आणता येईल का, तसा प्रयत्न करायचा आहे. त्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.