'विमानतळावर माझ्या आई-वडिलांना…', रंग दे बसंती फेम अभिनेत्याचे गंभीर आरोप

मुंबई, 28 डिसेंबर : विमानतळांवर सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांची तपासणी होत असते. प्रसिद्ध व्यक्ती किंवा मौल्यवान सामन बाळगणाऱ्यांना तर अनेकदा चौकशीलाही सामोरं जावं लागतं. अभिनेते-अभिनेत्रींना विमानतळावर चौकशीसाठी अडवल्याच्या बातम्याही अनेकदा समोर येतात. त्यांना या प्रक्रियेचा मनस्तापही सहन करावा लागतो. ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थला नुकताच असाच अनुभव आला. मदुराई विमानतळावर आपली आणि आपल्या जेष्ठ पालकांची विनाकारण तपासणी करून त्रास दिला गेला, असा आरोप सिद्धार्थनं केला आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विमानतळावरील एक फोटो शेअर केला आणि त्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं. विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना इंग्रजीत बोलण्यास सांगूनही ते त्यांच्याशी हिंदीतच बोलत होते. माझ्या पालकांना हिंदी समजत नाही. जेव्हा मी या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर ‘भारतात अशाच प्रकारे तपासणी होते,’ असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा – Abhijeet Bichukale : पठाणमधील शाहरुखचा तो लुक माझ्यासारखा; अभिजीत बिचुकलेचा मोठा दावा
इन्स्टाग्राम स्टोरीजवर विमानतळावरील फोटो शेअर करत सिद्धार्थने लिहिलं, “सीआरपीएफकडून मदुराई विमानतळावर 20 मिनिटे मनस्ताप देण्यात आला. त्यांनी माझ्या ज्येष्ठ पालकांची तपासणी करताना त्यांच्या बॅगमधून अक्षरश: नाणीदेखील बाहेर काढायला लावली! इंग्रजीत बोलण्याची विनंती करूनही ते आमच्याशी वारंवार हिंदीत संवांद साधत होते.” ही पोस्ट टाकताना सिद्धार्थनं चुकून सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ऐवजी सीआरपीएफला टॅग केलं.
सिद्धार्थ अनेकदा चर्चेत असतो. जानेवारीमध्ये (2022) भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवालविरुद्ध केलेल्या ट्विटबद्दल त्याच्यावर हैदराबाद पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेनं गुन्हा दाखल केला होता. पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल साईना नेहवालनं ट्विट केलं होतं. त्या ट्विटला सिद्धार्थनं रिप्लाय दिला होता. पण, त्याचे ट्विट ‘सेक्सिस्ट’ असल्याची जोरदार टीका झाली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विटर इंडियाला त्याचं अकाउंट तत्काळ ब्लॉक करण्यास सांगितलं होतं.
आयपीसी कलम 509 (महिलांच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूनं वापरलेले शब्द, हावभाव किंवा कृती) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली सिद्धार्थवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली होती. त्यानंतर सिद्धार्थने सार्वजनिकपणे माफी मागितली होती.
सिद्धार्थनं अनेक तमीळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातील आमीर खानसोबतच्या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. सिद्धार्थ या वर्षी डिस्ने प्लस हॉटस्टरवरील ‘एस्केप लाईव्ह’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. तो आता कमल हसनच्या ‘इंडियन 2’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात नेदुमुदी वेणू, सुदीप, गुलशन ग्रोवर, काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही भूमिका आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.