वर्षाच्या पहिल्या दिवशी घ्या देवाचं दर्शन, वाचा प्रमुख मंदिरांचं वेळापत्रक

मुंबई, 31 डिसेंबर : 2023 सुरू होण्यास आता काही तासांचा कालावधी उरलाय. वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचं दर्शन घेण्याची अनेकांची पद्धत असते. यंदा तर 1 जानेवारी रोजी रविवार आल्यानं मंदिरात दर्शनासाठी गर्दी होणार आहे. भक्तांची ही गर्दी लक्षात घेऊन राज्यातील प्रमुख मंदिरांनी 1 जानेवारी रोजी दर्शनाच्या वेळेत खास बदल केले आहेत.
सिद्धिविनायक मंदिर होणार लवकर सुरू
मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी रांगाच रांगा लागल्या असतात. नववर्षदिनी 1 जानेवारीला भाविकांना प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाचे दर्शन पहाटे 3.15 पासून घेता येणार आहे. पहाटे 5.30 वाजता आरती होईल. नववर्ष तसेच रविवार असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी सिद्धिविनायक दर्शनासाठी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या नियोजनासाठी रांगेचीही विशेष व्यवस्था करणात आली आहे.
दगडूशेठमध्ये विशेष आरती
पुण्यातील दगडशेठ गणपती मंदिरात 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता विशेष आरती होणार आहे. त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. नववर्षानिमित्त मंदिरात खास तयारी करण्यात आलीय. यावेळी मंदिर खास फुलांनी सजवण्यात येणार आहे. तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत मंदिर खुलं असेल.
पुणेकरांनो, रात्रभर करा नववर्षाचं स्वागत! प्रशासनाकडून Good News जाहीर
अंबाबाई मंदिर, कोल्हापूर
नवीन वर्षाची सुरुवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाने व्हावी, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. त्यामुळे अंबाबाई मंदिरात यानिमित्ताने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळत असते. यंदाही पहाटे पावणेपाच वाजता मंदिर उघडल्यानंतर दिवसभर भाविकांना देवीचे दर्शन घेता येईल. तर रात्री दहा वाजता शेजारती नंतर मंदिर बंद करण्यात येईल. नववर्षाारंभ आणि सुट्टी यामुळे जास्त गर्दी होत आहे. देवस्थानकडून गर्दीचे नीट नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही नवीन वर्षाच्या दिवशी भाविकांची रांग असेल रविवारी पहाटे चार वाजता मंदिरात आरती होईल. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास मंदिर दर्शनासाठी खुलं होईल. रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिर 31 डिसेंबर रोजी रात्रभर दर्शनासाठी सुरू असेल. 1 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हे मंदिर सुरू असेल. दहा वाजता साईबाबांची आरती सुरू होणार असून ती आरती रात्री साडेदहापर्यंत चालेल. त्यानंतर रात्री 11 वाजता मंदिर बंद होईल, अशी माहिती देवस्थान समितीानं दिलीय. कोरोनाचा धोका लक्षात घेता भाविकांनी सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहनही राज्यातील प्रमुख देवस्थानानं केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.