वडगाव मावळ : आपल्यातच गद्दारी झाली म्हणून एक ग्रामपंचायत गेली, सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही गद्दारच नडले. त्यामुळे निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपल्यातील गद्दार फक्त ओळखा आणि फक्त नीट रहा, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली. वडगाव मावळ येथे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बाबूराव वायकर, सुभाषराव जाधव, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी सन्मान समारंभ संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, मुख्य संघटक संजय बाविस्कर, मुख्य प्रवक्ते राज खांडभोर, चंद्रकांत दाभाडे, नारायण ठाकर, दत्तात्रय पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा राऊत, पुष्पा घोजगे, युवती अध्यक्ष आरती घारे, ओबीसी सेल अध्यक्ष संध्या थोरात, हेमा रेड्डी, पद्मावती ढोरे, शैलजा काळोखे आदी उपस्थित होते.

नऊ ग्रामपंचायतींना प्रत्येकी 25 लाख रुपये निधी देणार आमदार शेळके यांनी पुढे बोलताना निवडणुका झालेल्या नऊ ग्रामपंचायतींना प्रत्येकी 25 लाख रुपये निधी देणार असल्याचे घोषित केले. विरोधक निधी आणल्याच्या खोट्या वल्गना करत असल्याचा आरोप करून गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुमारे 1200 कोटी रुपयांचा निधी आला. त्यांची खरच ताकद असेल तर त्यांच्या सरकारच्या माध्यमातून किमान 600 कोटींचा निधी आणावा मी त्यांचा जाहीर सत्कार करतो, अशी टिपण्णीही आमदार शेळके यांनी केली.

विरोधकांपासून सावध रहा
विरोधक आपल्यात भांडण लावून संधी साधून घेतात. त्यामुळे आगामी निवडणुका लढवताना सावध राहणे गरजेचे आहे. त्यासाठी वरिष्ठांनी घेतलेला निर्णय प्रत्येकाने ऐकला पाहिजे, विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता निवडणुका लढवल्या तर निश्चित यश मिळेल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना दिली जात आहे ताकद
बबनराव भेगडे यांनी आमदार शेळके हे विधानसभेतील मावळचा बुलंद आवाज असल्याचा उल्लेख करून त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या मावळच्या विकासाचा फायदा सर्वांनी करून घ्यावा, असे आवाहन केले. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे पक्षातील कार्यकर्त्यांना भक्कम ताकद दिली जात असून, या ताकदीच्या जोरावर तळागाळापर्यंत पोहोचून यश मिळवावे, असे
आवाहन केले.

पक्ष विरोधकांची हकालपट्टी करणार
पक्षातील गद्दार मंडळींमुळे पराभव पत्करण्याची वेळ येते. अशा गद्दारांना अभय दिले तर पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे नुकसान होते. त्यामुळे अशा गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ आली असून, यापुढे अशा गद्दारांची हकालपट्टी करणारच असा सज्जड दमही आमदार शेळके यांनी दिला.