मेंडोस चक्रीवादाळाचा राज्यातील हवामानावर परिणाम, पाहा तुमच्या शहरातील तापमान

मुंबई, 14 डिसेंबर : देशाच्या पूर्व किनारपट्टीवर दाखल झालेल्या मेंडोस चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. या वादळामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, आणि नाशिक मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रात पुणे तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीय. या वादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून तापमानावरही याचा परिणाम झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सांगलीमध्ये मागील 24 तासांमध्ये कमाल तापमान 27.7 तर किमान तापमान 21.8 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. सोलापूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यातही उकाडा जाणवतोय. सोलापूरमध्ये कमाल 30 तर किमान 19 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे शहरातील तापनानाचा पार 20.1 सेल्सियसपर्यंत खाली घसरलाय. येत्या काळात हे तापमान आणखी कमी होईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. गेल्या दोन दिवसात कोल्हापुरात ढगाळ वातवरण होते. काल काही ठिकाणी पावसाचा किंचित शिडकावा झाला. आज दिवसभर देखील ढगाळ वातावरण असण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरमध्ये कमाल 26.8 तर किमान 21.0 अंश तापमान नोंदवण्यात आले आहे.
Pune Tmin Waiting for its next winter spell !! pic.twitter.com/Y9Ch8nfwBw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 14, 2022
उत्तर आणि मध्य महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 28.8 तर किमान 19.9 अंश तापमानाची नोंद झालीय. तर अहमदनगरमध्ये मागील 24 तासांमध्ये कमाल तापमान 29 अंश तर किमान 20 अंश सेल्सियस इतके होते.
मराठवाडा
मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कमाल तापमान 28.2 तर किमान 17.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर बीड शहरात कमाल तापमान 27.3 तर किमान 21.1 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.
तेलबिया पिकांची लागवड घटली, सूर्यफूल नामशेष होण्याच्या मार्गावर
विदर्भ
विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून अंशिक ढगाळ वातावरण आहे. नागपूरमध्ये मागील 24 तासांमध्ये कमाल 30.6 तर किमान 21.4 अंश तर वर्ध्यात कमाल 33.0 तर किमान 22.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर अमरावतीमध्ये कमाल 31 तर किमान 20 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.