'राष्ट्रवादीचा माझ्यावर हल्ल्याचा कट, हॉटेल चालकाने अडवून उधारी मागावी हा प्लॅन'

मुंबई, 19 जून : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot) यांना एका हॉटेल चालकाने अडवलं होतं. या हॉटेल चालकाने सदाभाऊ खोत यांच्याकडे थकीत उधारीची मागणी केली होती. पण सदाभाऊ यांच्याकडून अशाप्रकारची कोणतीही उधारी थकीत नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. या प्रकरणावर सविस्तर माहिती देण्यासाठी सदाभाऊ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) गंभीर आरोप केले आहेत. हॉटेल चालकाने आपल्याला रस्त्यावर अडवणं हे राष्ट्रवादीचं कटकारस्थान होतं. राष्ट्रवादीचा आपल्यावर हल्ला करण्याता प्लॅन होता. पण तो प्लॅन हाणून पाडला, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. “राष्ट्रवादीने षडयंत्र रचलं. पक्षाचे कार्यकर्ते घेऊन थेट माझ्या अंगावर यावं. पण राष्ट्रवादीचा हल्ला झाला म्हणून राज्यात नाचक्की होईल. मग त्यांनी प्लॅनिंग तयार केलं. हॉटेल चालकाने जायचं. मला अडवायचं. माझ्यावर बोलत राहायचं. मग माझ्या कार्यकर्त्याने धक्काबुक्की केली की माझ्यावर खुनी हल्ला करायचा. हा ठरलेला प्लॅन होता. पण त्यांचा तो प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही. त्यांचं हे पितळ आज उघड झालं आहे. हॉटेल चालक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. या कटकारस्थानामध्ये टोमॅटोच्या गालाचा असलेला राष्ट्रवादीचा नेता होता”, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. “मी मंत्री असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यावर रेस्ट हाऊसमध्ये हल्ला केला होता. जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा यात्रेच्या वेळी सुद्धा सोलापूरच्या रेशनिंग ऑफिसमध्ये हल्ला करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले होते. तुमच्या नाकाला एवढ्या मिरच्या झोंबतात तर राज्यातल्या शेतकऱ्याला मदत करा. केळी उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. डाळींबा बागा नष्ट झाल्या आहेत. यावर आम्ही बोलणार. पण आम्ही बोलत असताना तुम्ही अशा पद्धतीने कटकारस्थान रचून आमचा आवाज दाबणार तर आम्ही शांत बसणार नाही”, असं सदाभाऊ म्हणाले. (विरोधकांकडून सोलापूरच्या ‘या’ नेत्याला राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी?) “जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा यात्रेच्यावेळी मी बोललो होतो की, मला एखाद्या खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. त्यावेळी अनेकांनी प्रश्न विचारले. त्याचा हा ढळढळीत पुरावा समोर आलेला आहे. केतकी चितेळीच्या एका पोस्टने संपूर्ण महाराष्ट्रभर गुन्हे दाखल होतात मग आम्ही तक्रार दाखल करतो तर गुन्हे का दाखल होत नाही?”, असा सवाल सदाभाऊंनी केला. “राष्ट्रवादीचा माजी आमदार दिपक साळुंखे यांनी सर्व कटकारस्थान रचला. तुम्ही जे मैदान ठरवाल तिथे मी येतो. समोरासमोर लढाई होऊ द्या. शिखंडीसारखं मागून लढू नका. मी काही कच्या गुरुचा चेला नाही”, असं आव्हान सदाभाऊंनी दिलं. तसेच “या सर्व राष्ट्रवादीच्या ढेंड्यांना सांगू इच्छितो, आमचा लढा हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे कटकारस्थान करा आम्ही भीक घालणार नाही”, अशी टीकादेखील त्यांनी केली. हॉटेल चालकाच्या आरोपांवर सदाभाऊ काय म्हणाले? “हॉटेल चालकाने ज्या तारखा दिल्या आहेत त्या निवडणुकीच्या नंतरच्या आहेत. निवडणूक झाल्यानंतर सलग 25 दिवस हॉटेलमधून जेवण दिलं गेलं असा दावा करण्यात आला आहे. पण निवडणुकीनंतर ते कसं शक्य आहे? राज्यात असा कोणता लोकप्रतिनिधी आहे जो निवडणुकीनंतर एक महिने खानावळी चालवतो? हॉटेल मालकाने कागदावर लिहिलं होतं. पण त्या कागदाला नऊ वर्षांनंतरही घडी पडलेली नाही. नऊ वर्ष हा माणूस का बोलला नाही? नऊ वर्षानंतर त्यांनी ज्या तारखा सांगितल्या आहेत त्या मतदान झाल्यानंतरच्या आहेत. मतदान झाल्यानंतरच्या तारखा राष्ट्रवादीच्या नेत्याने लिहून देताना निदान मतदान किती तारखेला होतं ते बघायचं होतं”, असं सदाभाऊ खोत म्हणाले. “हॉटेल मालकाने दावा केलाय की निवडणूक झाल्यानंतर पंधरा दिवसांनी सदाभाऊला फोन केला. माझं बिल द्या, सांगितला. तर ते म्हणाले, मी आता आमदार आणि मंत्री आहे. माझ्या पीएला फोन करा. मी आमदार आणि मंत्री सव्वा दोन वर्षांनी झालो. 2016 ला आमदार झालो. ती तरी तारीख खरी काढायची. म्हणजे हॉटेल चालक हा खोटं बोलतोय”, असं दावा सदाभाऊंनी केला.
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.