Home » मुंबई » महाराष्ट्रात गुजरातची पुनरावृत्ती, अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीसारखा खेळ

महाराष्ट्रात गुजरातची पुनरावृत्ती, अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीसारखा खेळ

महाराष्ट्रात-गुजरातची-पुनरावृत्ती,-अहमद-पटेल-यांच्या-राज्यसभा-निवडणुकीसारखा-खेळ

मुंबई, 10 जून : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीवरुन राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. विशेष म्हणजे राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदानही पार पडलं. या निवडणुकीचा निकाल आतापर्यंत जाहीर होणं अपेक्षित होतं. पण सर्व आमदारांच्या मतदानानंतर चार ते पाच तास उलटून गेल्यानंतरही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. त्या पत्राची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दरम्याने सीसीटीव्ही फुटेज मागवले आहेत. हे सर्व फुटेज केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. पण महाराष्ट्राच्या सहा जागांच्या या निवडणुकीत भाजपने जो आक्षेप घेतला आहे त्याला 2017 च्या गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींचा दाखल दिला आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात त्याबाबत उल्लेख केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही गुजरातची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे. गुजरातमध्ये 2017 च्या राज्यसभेत नेमकं काय घडलं होतं? गुजरातमध्ये 2017 ला राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक पार पडली होती. ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीतही आजसारखेच डावपेच बघायला मिळाले होते. राज्यसभेच्या आजच्या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांच्या मतदारांवर आक्षेप घेतलाय. पण 2017 च्या गुजरातमधील निवडणुकीत काँग्रेसने आक्षेप घेतला होता. काँग्रेसच्या दोन सदस्यांनी क्रॉस वोटिंग करत भाजपचे नेते अमित शाह यांना मतपत्रिका दाखवली होती. काँग्रेसने यावर आक्षेप घेत थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. (हरियाणात ‘महाराष्ट्र पार्ट 2’, राज्यसभेच्या मतमोजणीपूर्वी तक्रारींचा गोंधळ, निकाल लांबणीवर) संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपचे नेते अमित शाह यांना मतपत्रिका दाखवत भाजपला मत दिलं होतं. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता काँग्रेसचे निवडणूक एजंट शक्ती सिंह गोहिल आणि अर्जुन मोढवाडिया यांनी तात्काळ या मुद्द्यावरुन आक्षेप नोंदवला होता. त्यांनी रिटर्निंग अधिकारी आणि निववडणूक आयोगाला तक्रार पाठवली होती. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 9 वाजेच्या दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल होत दोन मतं रद्द करण्याची मागणी केली होती. या दरम्यान संध्याकाळी सात वाजता काँग्रेस नेत्यांच्या पाठोपाठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री देखील दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले होते. भाजपने मतमोजणी तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अनेक तास याप्रकरणी बैठक झाल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने रात्री साडे अकरा वाजता काँग्रेसच्या दोन्ही आमदारांचे मतं बाद केले. त्यानंतर मतमोजणीचे आदेश दिले. अखेर रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी निकाल जाहीर झाले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत अहमद पटेल यांचा अवघ्या अर्ध्या मताने विजय झाला होता. भाजपने महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या मतदानानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र जसंच्या तसं : मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त, भारत निवडणूक आयोग, निर्वचन सदन, अशोक रोड, नवी दिल्ली-110001 विषय: 10 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेचे उल्लंघन-मतदान रद्द सर, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की सर्व श्रीमती. यशोमती ठाकूर आमदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादीचे श्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे श्री सुहास कांदे आणि या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधींशिवाय इतर व्यक्तींना त्यांची मतपत्रिका उघडपणे दाखवून मतदान प्रक्रियेत तडजोड केली आणि उल्लंघन केले. इतर प्रक्रिया. 2017 मध्ये अहमद पटेल प्रकरणात आयोगाने अशा अटी ठेवल्या होत्या ज्यात निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारे कोणतेही मत मतदानाच्या वेळी किंवा मतमोजणीच्या वेळी रद्द केले जाईल. या तिन्ही प्रकरणातील आक्षेप भाजप निवडणूक एजंट व इतरांनी रिटर्निंग ऑफिसरकडे दाखल केले होते. आरओने सादर केलेल्या तथ्यांचा विचार न करता किंवा निवडणूक नियम 1961 च्या वर्तनाची तपासणी न करता, मतदान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे पक्षाच्या प्रतिनिधींनी भारत निवडणूक आयोगाकडे निवेदने सादर केली. [त्याच्या प्रती संलग्न आहेत.] वरील बाबी लक्षात घेता, अहमद पटेल 2017 प्रकरणात, आम्ही आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि निवडणूक नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करणारी मते रद्द करण्याची तसेच आयोगाच्या आदेशानुसार निकाली काढण्याची विनंती करतो.

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.