मासळी पकडण्यासाठी समुद्र किनारी अचानक गर्दी; अर्नाळा समुद्रकिनारी तारली मासळीचा खच कसाकाय पडला?

जीवंत तारली मासळीचा गुरुवारी अर्नाळा समुद्र किनारी खच पडल्याने समुद्र परिसरात पहिल्यांदाच आगळंवेगळं चित्र नागरिकांना पाहायला मिळाले आहे.
Image Credit source: Google
विरार : मासे पकडण्यासाठी मच्छिमार बांधवांना मोठी कसरत करावी लागत असते. त्यासाठी खोलवर पाण्यात जाऊन मासे पकडतात, तर काहीवेळेला जाळे टाकून मच्छीमारी केली जाते. पण समुद्र किनारी हेच मासे आयते आले तर? आश्चर्य वाटणारा हा प्रश्न असला तरी असं विरारच्या पश्चिम भागातील समुद्र किनारी असा प्रकार समोर आला आहे. नागरिकांची मासळी घेण्यासाठी झुंबड उडल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे अनेकदा केमिकल किंवा ऑइल समुद्रात टाकल्याने मृत मासळीचा खच समुद्र किनारी पाहायला मिळत असतो. मात्र, जीवंत मासळीचा खच पडल्याने नागरिकांनी मासळी उचलण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक ते दीड फुट पाण्यातच ही मासळी फडफड करतांना दिसून आल्याने नागरिक मिळेल ते घेऊन मासळी पकडण्यासाठी गर्दी करत होते. मात्र, हा खच जीवंत कसा काय आला? समुद्रात कुणी काही केमिकल टाकले का? ऑइल टाकले होते का? याबाबत वेगवेगळी चर्चा समुद्र किनारी सुरू आहे.
अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर तारली जीवंत मासळीचा खच पडल्याने ती घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी गुरुवारी झाली होती.
जीवंत तारली मासळीचा गुरुवारी अर्नाळा समुद्र किनारी खच पडल्याने समुद्र परिसरात पहिल्यांदाच आगळंवेगळं चित्र नागरिकांना पाहायला मिळाले आहे.
दरम्यान, मासळी तर मिळाली पण ती अचानक खच स्वरूपात पडल्याने ती विकायची की नाही यावरून मतभेद नागरिकांमध्ये होते, दुष्परिणाम होणार नाही याबाबत चर्चा सुरू होती.
त्यातच समुद्र किनारी मासळीची पाण्यातील फडफड हा नजारा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, विरारच्या पश्चिम भागातील हे दृश्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.