Attacking leopard captured in malthan

टाकळी हाजी (ता, शिरूर ); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील माळवाडी येथील गणेश सीताराम भाकरे यांच्या घरासमोर अवघ्या 100 मीटर अंतरावर लावलेल्या पिंजर्‍यात गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला. माळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भाकरे हे रात्री शेताला पाणी देत असताना सव्वाबाराच्या सुमारास काही अंतरावर अचानक जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता तो आवाज बिबट्यासाठी लावलेल्या पिंजर्‍याचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्यामुळे त्यांनीच वन विभागाच्या अधिकार्‍यांकडे मागणी करून तिथे पिंजरा लावला होता.

पिंजर्‍यात बिबट्या अडकल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे यांना कळवताच त्यांनी वन विभागाच्या कर्मचार्‍यांना ही माहिती दिली. त्यांनी सकाळी वन विभाग येऊन पिंजरा घेऊन जातील, असे सांगितले. बिबट्या जेरबंद झाला. परंतु, पिंजर्‍यात असलेले दरवाजाकडील प्लायवूड बिबट्याने पंजाने तोडले होते.

त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेले सरपंच सोमनाथ भाकरे यांनी ही माहिती वनरक्षक लहू केसकर यांना कळविताच ते त्यांच्या सहकार्‍यांसह गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी या बिबट्यास जवळपास सोडू नये, अशी विनंती केली असता या बिबट्याला माणिकडोह येथील जंगलात सोडणार असल्याचे वनरक्षक केसकर यांनी सांगितले.

थेट घरासमोर येऊन पशुधनावर हल्ले करण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे या भागात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. पिंजरा लावल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी बिबट्या या पिंजर्‍यात जेरबंद झाल्यामुळे तूर्तास जरी भीती कमी झाली असली तरी आणखी बिबट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.