'माझं तुझ्यावर प्रेम….'अखेर आशुतोष अरुंधतीला करणार प्रपोज; काय असेल तिचं उत्तर

मुंबई, 29 डिसेंबर : ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या कथानकात येणाऱ्या ट्विस्टमुळे दिवसेंदिवस मालिका रंजक होत आहे. एकीकडे देशमुख कुटुंबात नव्या पाहुणीच आगमन तर दुसरीकडे अभि आणि अनघात येणाऱ्या दुराव्यामुळे मालिकेला वेगळं वळण लागलं आहे. त्याचसोबत एकीकडे अनिरुद्ध आणि संजनाचं नातं तुटत असताना दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष मध्ये जवळीक वाढत आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. मालिकेतील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्याविषयी मोठी घडामोड घडणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती आशुतोषला आपल्या मनातील भावना सांगणार होती. पण तेव्हाच तिने अभिला त्या मुलीसोबत पाहिलं आणि मालिकेला वेगळं वळण लागलं. आता मात्र देशमुखांच्या घरात सगळं सुरळीत झालं आहे. अरुंधती आपलं आयुष्य आशुतोष सोबत काढण्याच्या विचारात असताना त्याच्या आयुष्यात मात्र अनुष्काची एंट्री झाली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीसा दुरावा आला होता. आता मात्र आशुतोष अखेर त्याच्या मनातील भावना सांगून तिचं उत्तर विचारणार आहे.
हेही वाचा – कोणी फक्त 12वी पास तर कोणी उच्चशिक्षित, या बॉलिवूड स्टार्सचं शिक्षण वाचून व्हाल चकित
मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. सिरियल जत्राने टाकलेल्या या प्रोमोनुसार आशुतोष अरुंधती एकत्र बसलेले असतात. तेव्हा कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत दोघेही गप्पा मारत असतात. तेव्हा आशुतोष अरुंधतीसमोर त्याचं मन मोकळं करतो. तो म्हणतो, ‘अरुंधती, मी आयुष्यात आजपर्यंत एकाच मुलीवर मनापासून प्रेम केलंय आणि ती तू आहेस. अनुष्काच्या येण्याने तू परत जात असलीस तर तो विचार मनातून काढून टाक.’
तो पुढे अरुंधतीला मी ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्या होकारासाठी थांबलोय असरुंधती.’ आता आशुतोषला अरुंधती काय उत्तर देते ते पाहणं महत्वाचं आहे.
अरुंधती दुसऱ्या व्यक्तीसोबत पुन्हा संसार थाटणार आहे. ही गोष्ट त्याला मान्य होणार का? देशमुखांच्या घरातल्यांसोबतच मालिकेचे प्रेक्षक अरुंधतीच्या या निर्णयाला पाठिंबा देणार का, अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न अखेर होणार का हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एकीकडे घरात अभि आणि अनघाचं नातं तुटत असताना अरुंधती स्वतःच नवं नातं कसं जुळवणार, तिच्या या निर्णयात घरातील सगळे तिला साथ देणार का हे जाणून घेण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.