माजी पोप बेनेडिक्ट 16वे यांचे निधन, 600 वर्षांत राजीनामा देणारे पहिलेच पोप

कॅथलिक चर्चचे सर्वात मोठे धर्मगुरू राहिलेल्या माजी पोप बेनेडिक्ट यांचे शनिवारी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी 2013 मध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. पद सोडताना त्यांनी आपल्या बिघडणाऱ्या प्रकृतीचे कारण दिले होते.
बेनेडिक्ट यांच्या आधी 1415मध्ये पोप ग्रेगरी बारावे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा दोन गटातील वादाचे कारण सांगितले गेले होते. त्यानंतर जवळपास सहाशे वर्षांच्या इतिहासात पोप पदाचा राजीनामा देणारे बेनेडिक्ट हे पहिलेच पोप होते. बेनेडिक्ट यांच्या कार्यकाळात प्रीस्टच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला होता. धर्मगुरूंकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याच्या आरोपानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. तेव्हा म्युनिकचे आर्चबिशप असताना या प्रकरणाच्या बैठकीवेळी आपल्याकडून चूक झाल्याचंही बेनेडिक्ट यांनी मान्य केलं होतं.
हेही वाचा : Corona Virus : ओमिक्रॉनपेक्षाही धोकादायक, कोरोनाचा XBB15 व्हेरियंट, जगभरात हाहाकार माजवणार
पोप एमेरिट्स बेनेडिक्ट हे व्हेटिकनमध्ये 16 पोप होते. ते जर्मन धर्मशास्त्रीही होते. प्रवक्ते माटेओ ब्रूनी यांनी पोप बेनेडिक्ट यांच्या निधनाची माहिती दिली. त्यानी म्हटलं की, व्हेटिकनमध्ये माटर एक्लेसिया मठात पोप एमेरिट्स बेनेडिक्ट यांचे निधन झाले. आठवड्याच्या सुरुवातीलाच पोप फ्रान्सिस यांनी माजी पोप बेनेडिक्ट हे खूप आजारी असल्याचं म्हटलं होतं. तसचं बेनेडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहनही केलं होतं.
2005 मध्ये तत्कालीन पोप जॉन पॉल यांच्या निधनानंतर बेनेडिक्ट यांची पोप पदी निवड झाली होती. पोपच्या मृत्यूनंतरच नव्या पोपची निवड करण्याची परंपरा आहे. मात्र बेनेडिक्ट यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर फ्रान्सिस यांची पोप पदी निवड झाली होती. अखेरच्या भाषणात त्यांनी मी आता एक साधा प्रवासी असून पृथ्वीवरील माझ्या प्रवासातील अखेरचा टप्पा सुरू झाला आहे असं त्यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.