'महाविकासआघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली नाही तर…', अजित पवार आक्रमक

मुंबई, 15 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसचं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांवरून महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. 17 डिसेंबरला महाविकासआघाडी मुंबईत मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला अजून मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, तरीही महाविकासआघाडी मोर्चा काढण्यावर ठाम आहे. मोर्चाला परवानगी मिळाली नाही, तरी मोर्चा काढणारच, असा निर्धार अजित पवारांनी केला आहे.
मोर्चाच्या नियोजनाबाबत महाविकासआघाडीची बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली.
काय म्हणाले अजित पवार?
अनेक संघटना, एनजीओदेखील मोर्चात सहभागी होणार आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद, महागाई, बेरोजगारी हे मोर्चाचे मुद्दे आहेत. मागच्या 6 महिन्यांमध्ये बेताल वक्तव्य सुरू आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली.
‘परवानगी मागितली आहे, पण अजून मिळालेली नाही, मिळतील असा विश्वास आहे. मुंबईत मोर्चा निघणार. महाराष्ट्रातून ज्यांना यायचंय ते उत्सफूर्तपणे या मोर्चात सहभागी होतील. महापुरुषांचा अपमान, सीमावाद, महागाई, बेरोजगारी, हे मोर्चाचे मुद्दे आहेत,’ असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू मांडण्याचं काम हरीष साळवे यांनी करावं, अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी ही मागणी केली आहे. फडणवीसही आपण साळवींशी बोलतो, असं म्हणाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.