Home » महाराष्ट्र » ‘स्वप्नपूर्ती’ची गच्ची

‘स्वप्नपूर्ती’ची गच्ची

‘स्वप्नपूर्ती’ची-गच्ची

नेरळला घर बांधले आणि त्याचे समर्पक असे नाव ठेवले ते म्हणजे- स्वप्नपूर्ती. या स्वप्नपूर्तीची गच्ची म्हणजे माझे आवडते ठिकाण. या गच्चीला समोरून एका बाजूला उतरत्या पायऱ्यांचे डिझाइन केले आहे.

माधुरी साठे
नेरळला घर बांधले आणि त्याचे समर्पक असे नाव ठेवले ते म्हणजे- स्वप्नपूर्ती. या स्वप्नपूर्तीची गच्ची म्हणजे माझे आवडते ठिकाण. या गच्चीला समोरून एका बाजूला उतरत्या पायऱ्यांचे डिझाइन केले आहे, तर दुसऱ्या बाजूला तयार खांबांचे डिझाइन केले आहे. त्यांना उठावदार लालसर रंग दिला आहे. उतरत्या पायऱ्यांच्या समोर एक डिझाइन करून त्यात गोल चंद्र बसविला आहे. या पायऱ्यांवर बसून ग्रुप फोटो काढता येतो, पायऱ्यांवर वेलीफुलांच्या कुंडय़ा ठेवता येतील, भेंडय़ा, गाणी, गप्पा मारता येतील. गच्चीच्या चारही बाजूने विशिष्ट अंतरावर खास शोधून आणलेल्या फुलझाडांच्या कुंडय़ा बसविण्यात आल्या आहेत. आम्ही तेथे सुट्टीमध्ये जात असल्यामुळे रोज पाणी घालता येत नाही. त्यामुळे सध्यातरी त्यात आम्ही रंगीबेरंगी शोभेच्या फुलांची झाडे लावली नाहीत. परंतु नंतर नियमित राहायला गेल्यावर लावणार आहोत. जोरदार पाऊस व कडक उन्हापासून घराचे संरक्षण करण्यासाठी गच्चीला पत्रे लावून घेतले आहेत व त्याला छान रंग लावला आहे. गच्चीमध्ये एका बाजूला मधेच राहिलेला कॉलम तसाच ठेवून त्याच्यावर गोलाकार कडाप्पा बसविला आहे. त्यामुळे त्याचा टिपॉयसारखा वापर करता येतो. गच्चीच्या मधोमध असलेल्या शेडच्या खांबांना आधार देण्यासाठी त्याच्या बाजूने सिमेंटचे चौथरे तयार करून त्यावर नक्षीदार टाइल्स बसविल्या आहेत. चौथऱ्याच्या बाजूने रंगीबेरंगी टाइल्स लावल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर चार माणसे बसू शकतात आणि गप्पा मारू शकतात किंवा मोबाईलवरील गाण्यांचा आनंद लुटू शकतात. त्याच्या बाजूला खुच्र्या लावल्या तर चार-पाच माणसे चहा नाष्टय़ाला किंवा जेवायला बसून आरामात खाण्याचा आणि चहाचा आस्वाद घेऊ शकतात. गच्चीच्या बाजूने असलेल्या शेडच्या खांबांना, भिंतीला लागून आधारासाठी काँक्रीटचे ठोकळे केले आहेत. त्यावर रंगीबेरंगी टाइल्सच्या तुकडय़ांची नक्षी करण्यात आली आहे. नातेवाईक किंवा मित्रमंडळीचे स्नेहसंमेलन या गच्चीवर भरविता येते. लहान मुलांना तेथे खेळता येते. रात्री जेवल्यावर गच्चीवर शतपावलीही घालता येते.
या गच्चीच्या स्वत:च्या सौंदर्याबरोबरच ही गच्ची आजूबाजूचे सौंदर्यही दिलखुलासपणे दाखविते. या स्वप्नपूर्तीच्या गच्चीतून सकाळी दिसणारा सूर्योदय नयनरम्य असतो. एकदा सायंकाळी मी गच्चीवर उभी असताना पश्चिमेकडे सूर्याचा लालभडक गोळा मावळताना दिसला आणि मागे लक्ष गेले तर गोलाकार पूर्ण चंद्राचे दर्शन, असे दुर्मीळ दृश्य पाहायला मिळाले. याच गच्चीवरून रात्री आकाशात चांदण्यांचा मेळापण दिसतो.
ही गच्ची प्रत्येक ऋतूत आपल्याला आनंदी ठेवते. उन्हाळ्यात संध्याकाळी गच्चीवर घराच्या आजूबाजूच्या झाडांचा सुखद वारा मनाला मोहवितो. गच्चीवर शेड घातल्यामुळे पावसाळ्यातही तेथे जाता येते. पावसाळ्यात गच्चीत बसून भजी व चहाचा आस्वाद घेत निसर्गाचे सुंदर रूप पाहण्यासारखा अवर्णनीय आनंद नाही. पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरावर लहानमोठे स्फटिकासारखे धबधबे कोसळताना दिसतात. डोंगरावर इकडून तिकडे काळे ढग पळताना दिसतात, तर काही डोंगराला टेकलेले दिसतात. हे दृश्य विलक्षण असते. घराच्या मागे दूरवर शेतात कामे करणारी माणसे दिसतात. पावसामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. हिवाळ्यात माथेरानचा डोंगर धुक्याची दुलई पांघरल्यासारखा दिसतो. गच्चीवरून माथेरानला जाणाऱ्या मिनी ट्रेनचे दिवेही काळोखात कधीतरी चमकताना दिसतात.
या गच्चीवरून घराच्या समोरील माझा लाडका डौलदार आंबा दिसतो. झाडांवर घरटे बांधताना सुगरण दिसते. तिचे घरटे बांधण्याचे कसब वाखाणण्यासारखे असते. घराच्या मागील बाजूला पारिजातकाचा पडलेला सडा, बहरलेला मोगरा, अनंत दिसतो. या फुलांच्या सुगंधाने आणि फुलांवर रुंजी घालणारी आकर्षक फुलपाखरे बघून मन सुखावते. पपईचे लगडलेले झाड दिसते. गच्चीच्या एका बाजूने रायआवळे व कढीपत्ता काढता येतो. गच्चीवरून दुसऱ्या बाजूला जास्वंद व सीताफळाची झाडे आणि तिसऱ्या बाजूची नारळ, पेरू, चिक्कू, मदनबाण, अबोलीची झाडे मला न्याहाळता येतात. याच गच्चीवरून मला वेगवेगळया मनमोहक रंगाचे व आकाराचे किलबिलणारे पक्षी दिसतात. शुभ समजल्या जाणाऱ्या भारद्वाजाचेही दर्शन कधीतरी घडते. आंब्याच्या पानांत लपून गाणाऱ्या कोकिळेच्या कुहूकुहू स्वरात गुंगून जायला होते. सदासर्वकाळ मन मोहविणाऱ्या, तेथेच थबकायला लावणाऱ्या या गच्चीला माझ्या मनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
madhurisathe1@yahoo.com

Web Title: The floor dream fulfillment home relevant design bright rich color dream house amy

Leave a Reply

Your email address will not be published.