Home » महाराष्ट्र » थकबाकीमध्ये ५० टक्के सवलत केवळ १० दिवस; पुणे जिल्ह्यात १ लाख ६४ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ

थकबाकीमध्ये ५० टक्के सवलत केवळ १० दिवस; पुणे जिल्ह्यात १ लाख ६४ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ

थकबाकीमध्ये-५०-टक्के-सवलत-केवळ-१०-दिवस;-पुणे-जिल्ह्यात-१-लाख-६४-हजार-शेतकऱ्यांनी-घेतला-लाभ

कृषिपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे.

पुणे : कृषिपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठीची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. पुणे जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार २२० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून, त्यातील ४३ हजार ३७८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे.

दरम्यान, पुढील तीन महिन्यांमध्ये थकबाकीमुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ १० दिवस शिल्लक आहेत. सुधारित थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी ३१ मार्चपूर्वी थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे. चालू वीजबिल आणि थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून वीजबिल कोरे करावे तसेच कृषी आकस्मिक निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्र आणि जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांना हातभार लावावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार ११४ शेतकऱ्यांकडे एकूण ३१०१ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज आणि दंड माफी तसेच वीजबिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकऱ्यांकडे आता २३१० कोटी ७६ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम  ३१ मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी म्हणजे ११५५ कोटी ३८ लाख रुपये माफ होणार असून, वीजबिल देखील संपूर्ण कोरे होणार आहे.

३३७ कोटी ५७ लाख रुपयांचा भरणा

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६४ हजार २२० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी आणि चालू वीजबिलांपोटी ३३७ कोटी ५७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार, व्याजातील सूट असे एकूण ४४० कोटी ५१ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ४३ हजार ३७८ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम असा एकूण १३० कोटी रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ८६ कोटी १८ लाख रुपयांची सूट आणि संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

Web Title: Discount arrears farmers pune district benefited free from electricity bills ysh

Leave a Reply

Your email address will not be published.