Home » महाराष्ट्र » विद्यापीठाच्या चर्चासत्रातील दालनावरून आरोप-प्रत्यारोप

विद्यापीठाच्या चर्चासत्रातील दालनावरून आरोप-प्रत्यारोप

विद्यापीठाच्या-चर्चासत्रातील-दालनावरून-आरोप-प्रत्यारोप

महाजन यांनी परवानगी दिलीही होती; मात्र कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काहीच वेळात संस्थेला दालन बंद करावे लागले.

मुंबई :  मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संवादावेळी लावण्यात आलेल्या एका पुस्तक दालनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मार्क्‍सवादी साहित्याचा समावेश असल्यानेच हे पुस्तक दालन बंद करण्यात आल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे, तर या दालनावर असलेल्या राजकीय फलकबाजीवर आक्षेप घेण्यात आल्याचे मराठी विभागाचे म्हणणे आहे.

मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग, गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासन आणि साने गुरूजी स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरभारती साहित्य संवाद या कार्यक्रमांतर्गत विस्थापितांचे साहित्य या विषयावर गेल्या आठवडय़ात आयोजित चर्चासत्रात पुस्तक दालन लावण्याची परवानगी मराठी विभागाची विद्यार्थिनी पूजा चिंचोले हिने  विभागप्रमुख वंदना महाजन यांच्याकडे मागितली होती.

महाजन यांनी परवानगी दिलीही होती; मात्र कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काहीच वेळात संस्थेला दालन बंद करावे लागले. या दालनात कार्ल मार्क्‍स, लेनिन, एंगल, लिओ टॉलस्टॉय, रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य होते. तेथे भगतसिंग यांचा फलकही लावण्यात आला होता. त्यामुळेच हे दालन बंद करण्यात आले, असा आरोप पूजा हिने केला.

जनचेतनाच्या पुस्तक दालनात राजकीय फलकबाजी करण्यात आली असल्याने हे दालन बंद केल्याचे वंदना महाजन यांनी सांगितले. लेखक प्रा. हरी नरके यांनीही फेसबूकवर आपली भूमिका मांडली आहे. यात त्यांनी महाजन यांना पािठबा देत विद्यार्थिनीच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.

पूजा ही मराठी विभागाची विद्यार्थिनी असल्याने तिला पुस्तक दालनासाठी परवानगी देण्यात आली होती. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर या दालनावर राजकीय फलक दिसले. परवानगी फक्त जनचेतनाच्या दालनाला देण्यात आली होती; मात्र तेथे दिशा विद्यार्थी संघटनेचाही फलक लावण्यात आला होता. ते फलक काढण्यास सांगितले असता पूजाचा मित्र माझ्या अंगावर धावून आला.  – वंदना महाजन, मराठी विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ

वंदना महाजन यांनी दालन बंद करताना वरून दबाव असल्याचे कारण दिले. मी दिशा विद्यार्थी संघटनेची कार्यकर्ती असले तरीही या संघटनेचे फलक किंवा कोणतेही राजकीय फलक लावण्यात आले नव्हते. भगतसिंग यांच्या फलकावर आक्षेप घेण्यात आला. तो फलक काढल्यानंतर फक्त पुस्तकांच्या दालनालाही परवानगी देण्यात आली नाही. – पूजा चिंचोलेविद्यार्थिनी

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed