Home » Uncategorized » वनातलं मनातलं : रानभूल!!

वनातलं मनातलं : रानभूल!!

वनातलं-मनातलं-:-रानभूल!!

दिवाळीच्या सुटय़ा संपत आल्या, फटाक्यांची आतषबाजी विसावली, दिव्यांची रोषणाई विझली, आप्तेष्टांच्या भेटीगाठी झाल्या आणि फराळाचा पाहुणचार सरायला लागला की, मला जंगल खुणावू लागतं. माझे पाय आपसूकच जंगलाकडे वळतात, कारण निसर्गातले माझे सखेसोबती मला बोलावत असतात.

दिवाळीच्या सुटय़ा संपत आल्या, फटाक्यांची आतषबाजी विसावली, दिव्यांची रोषणाई विझली, आप्तेष्टांच्या भेटीगाठी झाल्या आणि फराळाचा पाहुणचार सरायला लागला की, मला जंगल खुणावू लागतं. माझे पाय आपसूकच जंगलाकडे वळतात, कारण निसर्गातले माझे सखेसोबती मला बोलावत असतात. नातलग आणि इतर स्नेहजनांच्या फराळाच्या पाहुणचारापेक्षा या निसर्गसख्यांचं आमंत्रण मी मनापासनं स्वीकारतो, कारण हा पाहुणचार मला जास्त भावतो आणि निसर्गातल्या माझ्या दोस्तांना ना म्हणणे ‘मेरे बस की बात’ नसते.
दहा बारा वर्षांपूर्वीची अशीच एक आनंदमय दिवाळी संपली तेव्हा मी गोंदियाला रहात होतो. दिवाळीच्या सुटय़ा संपायला काही दिवस अवकाश होता. मला जंगलाचे वेध लागले होते. गोंदियापासून साधारण पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं नागझिरा अभयारण्य मला खुणावू लागलं होतं. जाण्याची तयारी सुरू केली. कडाक्याची थंडी पडलेली होती म्हणून स्वेटर, पांघरायला जाड गोधडी, कानटोपी, हातमोजे आणि इतर गरम कपडे घेतले. सकाळी तीन वाजता निघायचं होतं म्हणून आदल्या रात्री लवकरच झोपलो, पण थंडी जोरात होती म्हणून जाग येऊनही उबदार गोधडीत अंग दुमडून तसाच झोपून राहिलो तर थेट साडेतीनला जाग आली. आईनं डबा तयार करून ठेवलेला होता. उठल्यावर काहीशा धावपळीतच तयारी केली. बाबांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा बॅगेत भरून बॅग सायकलच्या मागच्या कॅरिअरला बांधली.
थंडीतच कुडकुडत आईवडिलांचा निरोप घेतला. अंगावर गरम कपडे भरपूर घातले होते त्यामुळे उबदार वाटत होतं, पण दहा पंधरा किलोमीटर अंतर सायकल चालवल्यानंतर गरम व्हायला लागलं तरीही स्वेटर काही काढलं नाही. गोरेगाव ओलांडल्यानंतर मात्र असह्य़ व्हायला लागलं तेव्हा गरम कपडे काढले. सकाळची गार हवा अंगाला झोंबत होती आणि शरीराचा घाम वाळवून आणखीनच गार करत होती. एका मोटरसायकलला टो करून दहा-पंधरा किलोमीटर अंतर वेगात कापलं. त्यामुळे नागझिरा जंगलात बाराच्या सुमारास पोहोचलो. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या तळ्याच्या काठी काही वेळ आराम केला आणि काटेथुवा मचाणीवर जाण्यासाठी निघालो. वर्षांच्या या हंगामात अर्थात, पाऊस पडून गेल्यावर हिरवेगार गवत उंचच उंच वाढलेलं असतं. काही ठिकाणी तर ते इतकं वाढलेलं असतं की, पाच फूट अंतरावरचा प्राणी आपल्या नजरेत येऊ नये. जंगलाच्या आतल्या भागात जागोजागी पाणी साचल्यामुळे प्राणी सहजासहजी दृष्टीस पडत नाही, पण मला जंगलाची मजा घ्यायची होती. शिवाय, पावसानंतरचं हिरव्या रंगाची जादूई शाल पांघरलेलं जंगल पाहण्यातली मजा काही औरच असते. जंगलात फिरताना उन्हाळ्यात येतो तसा थकवाही येत नाही आणि त्रासही होत नाही. या आनंदात मी काटेथुवापर्यंत पायी चालत गेलो. मचाणीवर जाऊन त्या पडक्या मचाणीची थोडीफार डागडुजी केली आणि पक्ष्यांकडे, झाडांच्या हलणाऱ्या फांद्यांकडे बघत पाठीवर पडून राहिलो. संध्याकाळचा गारवा वाढत चालला होता, पण मी आपल्या आनंदात मग्न होऊन ते अलौकिक सृष्टीसौंदर्य लुटत होतो आणि मनात साठवून घेत होतो. अंधार पडत चालला तशी शांतता चालत आली आणि जंगलावर राज्य करू लागली. दुपारी झोप घेतल्यामुळे रात्री झोप लागत नव्हती म्हणून मचाणावरच बसून राहण्याचं ठरवलं. उठण्याचा प्रयत्न केला, तर दिवसभराच्या सायकलींगमुळे सर्वाग दुखत असून आराम करण्यातच भलाई असल्याचं जाणवलं. थंडीमुळे गोधडीच्या बाहेरही येता येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मचाणावर मुक्काम न करता रेस्टहाऊसलाच मुक्काम करण्याचं ठरवलं, पण आजची रात्र काढणं कठीण जात होतं, पण तरीही रात्रभर कण्हत कण्हत कुशी बदलत झोप घेतली.
सकाळी उठल्यावर रेस्टहाऊसला न जाता दिवसभर जंगलात फिरू आणि मग दुपारनंतर रेस्टहाऊसला पोहोचू, अशी योजना आखून मी मचाणावरून खाली उतरलो. सोबतीला बिस्किटाचे पुडे, शेंगदाणे आणि इतर काही खाण्याच्या वस्तू होत्या. थोडासा फराळ करून समोर निघालो. कुठल्या दिशेला जायचं, हे ठरलं नव्हतं, पण सरळ नाल्याच्या बाजूने जात राहायचं आणि त्याच मार्गानं परत यायचं हे पक्क केलं. पावसामुळे जंगलात असंख्य झरे वाहत होते. काही अगदी नावापुरता वहात होते, तर काही अगदी गुडघ्यापर्यंत पाय बुडतील इतके खोल होते. मी पाण्यातनं निघालो. भूक लागली की, पिशवीतला खाऊ खायचा आणि तहान लागली की, झऱ्यातलं पाणी प्यायचं, कुठला आवाज आला तर त्या दिशेनं सावध पावलं टाकत जायचं आणि काय होतं त्याचा अंदाज घ्यायचा, असं बराच वेळ चालू होतं. सकाळचे अकरा वाजले असावेत. आता गरम कपडय़ांचं आणि गोधडीचं वजन जड वाटायला लागलं होतं, पण सामान कमी करता येणारच नव्हतं. जाताना ज्या खाणाखुणा मला परतीच्या मार्गावर वाट सापडायला मदत करतील त्या त्या लक्षात ठेवत होतो.
बारा साडेबारा वाजेपर्यंत पाच सहा तास माझी सलग भ्रमंती चालू होती. मग मात्र थकवा यायला लागला. पाय पुढं टाकवेना म्हणून मग थोडय़ा वेळ आराम करून माघारी फिरायचं ठरवलं. पाण्याचा तुटवडा नव्हता, पण जवळचं खाण्याचं सामान सगळं संपलं होतं. डब्यातली भाजीही खराब झाली होती. अर्धा एक तास आराम करून परतीची वाट धरली. वाटेत येणाऱ्या नाल्याच्या पात्रातलं उंच गोधनीचं झाड, एखादा मोठा दगड, कुठलसं नागमोडी वळण, अशा अनेक खाणाखुणा बऱ्यापकी लक्षात होत्या, मात्र एका वाहणाऱ्या झऱ्यापाशी आल्यावर मला आठवेना आपण नक्की कुठून वळालो होतो ते. मी अंदाज घेऊन सरळ मार्गानं जात राहिलो. बराच वेळ चालत राहिलो तर जाताना आणखी काही वाहणारे झरे लागले आणि मी आणखीनच बुचकळ्यात पडलो. पहिल्यांदा लागलेल्या झऱ्यापासून आत वळायला पाहिजे होतं असं वाटून मी पुन्हा माघारी फिरलो, पण मी आणखीनच संभ्रमात पडलो, कारण जाताना पुन्हा अनेक झरे लागले यातला पहिला झरा कुठला, याचा अंदाज बांधणं कठीण होतं. काय करावं तेच उमजेना. अध्र्या तासापूर्वी असलेली प्रसन्नता कुठल्या कुठं लोप पावली. चेहरा चिंताग्रस्त आणि मन भयग्रस्त झाले. भिती नक्की कसली वाटत होती ते माहिती नाही, पण मी काहीसा घाबरलो होतो एवढं मात्र नक्की. निर्णय मलाच घ्यायचा होता, पण कुठं जायचं हे काही ठरत नव्हतं. काहीसा रडवेला झालो. काही वेळापूर्वी सोबत उडणारे पक्षी मित्र वाटत होते, पण आता ते माझी थट्टा करण्यासाठी तर आसपास उडत नाही ना, असं वाटायला लागले. आजूबाजूची झाडं कमरेवर हात ठेवून माझ्याकडे बघत हसत असल्यासारखी वाटत होती. शेवटी, एका झऱ्याच्या रोखानं निघून कित्येक किलोमीटर अंतर चालत राहिलो. तरीही काही मार्ग कळेना.
मी माझ्या मार्गापासनं हलायचंच नाही, असं ठरवलं. सलग चारपाच तास फिरल्यावर मात्र मी गळत चाललो होतो. शारीरिक दमछाक तर झालेलीच होती, पण मनदेखील नको ते विचार करून थकून गेलं होतं. सूर्य केव्हाच पश्चिमेच्या क्षितीजावर पोहोचला होता. त्याला थोडय़ा वेळ रेंगाळायला काय होतंय, असा विचारही माझ्या मनात येऊन गेला. साडेपाचपर्यंत काळोख दाटून आला. आता मात्र मी एखादी आडोशाची जागा सापडवावी, या विचारानं चालत होतो. अंधारात बॅटरीनं वाट चाचपडत चाललो होतो. बराच वेळ चालत राहिल्यावर एका दगडाच्या बेचक्यात थांबलो आणि रात्री मचाणीपेक्षा इथं सोयीस्कर म्हणून ही जागा निवडायचं ठरवलं. साप आला काय आणि अस्वल आलं काय जे होईल ते बघू असं ठरवलं.

जंगलात रानभूल होते हे माहित होतं, पण आपल्यासोबत असा काही प्रकार होऊ शकतो, असा कधी विचार केला नव्हता. दहा पंधरा मिनीटं गेल्यावर मला माणसांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. थोडा वेळ तणावपूर्ण शांततेत घालवल्यानंतर बॅटरीचा प्रकाश दिसला. सामान उचलून त्या प्रकाशाच्या दिशेनं चालायला लागलो. जीवाच्या आकांतानं हाक मारून त्या चालणाऱ्या माणसांना थांबवलं. त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलो हे कळलंहीा नाही इतक्या वेगात अंतर कापत मी त्यांना ‘कुठे चालले? असं विचारलं. त्यांनी ‘रेस्टहाऊसकडे’ हे उत्तर दिल्यावर खूपच हायसं वाटलं. काय घडलं हे त्यांना सांगण्यापेक्षा त्यांच्यासोबत चालणंो अधिक सोयीस्कर वाटले म्हणून त्यांना फक्त चला म्हटले. मनातनं घाबरलेला मी वरून अगदी नॉर्मल असल्याचं भासवत होतो.
थोडय़ा वेळ चालल्यावर रस्ता समजला. मी पार बंदरचुहा मचाणीजवळ पोहोचलो होतो. मी तिथपर्यंत कसा पोहोचलो, हेही समजत नव्हतं, पण रस्त्याला लागलो होतो. मनातल्या मनात देवाचे, निसर्गाचे आभार मानत पुन्हा एकटं फिरण्याचा वेडेपणा करणार नाही, असं मनोमन ठरवलं. अर्थात, त्यानंतरही अनेकदा जंगलात एकटा फिरलो. कित्येकदा भरकटलो, पण नागझिऱ्यातली ही ‘रानभूल’ मात्र आजही मला काहीशी अस्वस्थ करते. त्या दिवशी भीतीनं उडालेली गाळण आजही माझ्या अंगावर काटा आणते.    

महाराष्ट्र माझा आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Maharashtra Maza News) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *