Saturday, July 24, 2021
Homeमहाराष्ट्रTokyo Olympic : महाराष्ट्रातले मल्ल ऑलिम्पिकपर्यंत का पोहचत नाहीत?

Tokyo Olympic : महाराष्ट्रातले मल्ल ऑलिम्पिकपर्यंत का पोहचत नाहीत?

महिला फ्रिस्टाईल – सिमा बिस्ला (५० किलो), विनेश फोगट (५३ किलो), अंशु मलिक (५७ किलो), सोनम मलिक (६२ किलो)

पुरुष फ्रिस्टाईल – रवी कुमार दहिया (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो)

ही नावं आहेत यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय मल्लांची. या नावांमध्ये एकही नाव मराठी दिसणार नाही. कुस्ती हे नाव म्हटलं की महाराष्ट्रातल्या तमाम कुस्ती प्रेमींच्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे खाशाबा जाधव यांचं…महाराष्ट्राच्या या वीराने भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक मिळवून दिलं. यंदाचं टोकियो ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. कुस्तीची गौरवशाली परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा यंदाच्या ऑलिम्पिकमधला सहभाग मात्र अगदी नाममात्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ ८ खेळाडू यावेळी ऑलिम्पिकला पात्र ठरले असून यात एकाही कुस्तीपटूचा समावेश नाहीये.

मग असं झालं तरी काय की अचानक महाराष्ट्र कुस्तीत मागे पडला. खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राचा एकही मल्ल त्या पातळीवरचं यश का मिळवू शकला नाही. कालानुरुप महाराष्ट्राची कुस्ती कुठल्या गाळात फसत गेली हे आज आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करुयात.

कुस्ती म्हटलं की महाष्ट्रात आजही कोल्हापूर, सांगली, जळगाव, पुणे ग्रामीण, सोलापूर आणि मराठवाड्याचा काही भाग हा समोर येतो. या भागात मुलांमध्ये आजही कुस्तीचं वेड आहे. या भागांमधून आजही अनेक होतकरु मल्ल समोर येत आहेत. पण नीट विचार करायला गेलं तर कुस्ती हा खेळ महाराष्ट्राच्या एका ठराविक भागापुरताच अडकून राहिला ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट म्हणायला हवी. याचा अर्थ महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये होतकरु मल्ल नाही असा होत नाही, परंतू कुस्ती म्हटलं की राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांची नावं प्रेक्षक म्हणून आपल्यासमोर येणं हे कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं.

एखादा खेळ खऱ्या अर्थाने मातीत रुजला असं आपण केव्हा म्हणतो…की ज्यावेळी त्या खेळासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जातं. दुर्दैवाने महाराष्ट्राच कुस्ती आजही लाल माती की मॅट या द्वंद्वात अडकलेली दिसते. एकीकडे आंतरराष्ट्रीय कुस्तीचे आपलं रुप बदलत असताना महाराष्ट्रातले मल्ल अजुनही लाल मातीचाच आग्रह धरताना दिसतात. हा प्रकार म्हणजे एकीकडे जग चंद्रावर जाण्याची तयारी करत असताना आपण पत्रिकेतल्या ग्रहताऱ्यांवर अवलंबून राहण्यासारखं आहे.

आता यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कुस्तीपटूंची सराव केंद्र. महाराष्ट्राला यामध्ये मोठी परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र, जाणता राजा कुस्ती केंद्र, हिंद केसरी आखाडा, मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र, गोकुळ वस्ताद तालीम, राम सारंग यांचा आखाडा, बजरंग बली व्यायामशाळा अशी अनेक केंद्र महाराष्ट्रात आहेत. पण या केंद्रांना प्रोत्साहन देणारं धोरणच दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार जाहीर करत नाही. कुस्ती हा ताकदीचा खेळ आहे तसाच तो खर्चिक आहे. या केंद्रांना जर सरकारी मदत मिळणार नसेल आणि खेळाडूंना नेमकं क्रीडा धोरणच समजणार नसेल तर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कसे तयार होणार?

कुस्ती ही जेवढी आखाड्यात खेळली जाते तितकीच ती आखाड्याबाहेरही खेळली जाते. बदलत्या काळानुसार आता मल्लांना योग्य डाएट त्यानुसार व्यायाम, मानसोपचार तज्ज्ञांची मदत या गोष्टींची गरज असते. परंतू दुर्दैवाने या गोष्टी महाराष्ट्रात मल्लांना उपलब्ध होत नाहीत. सोनिपत, पटीयाला, दिल्ली यासारख्या ठिकाणी मल्लांसाठी या सुविधा उपलब्ध आहेत. पण महाराष्ट्रात जागतिक दर्जाचा कँप आणि मार्गदर्शन खेळाडूंना मिळत नाही ही ओरड अनेकदा कुस्तीतले जाणकार आणि खेळाडू करताना दिसतात.

खेळ कोणताही असो आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून देणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण यासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक एका खेळाडूमागे महाराष्ट्र सरकार करताना दिसत नाही. महाराष्ट्रात कुस्ती खेळणाऱ्या अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. उत्तरेकडील राज्यांनी कुस्तीची संस्कृती ही घट्ट केली आहे. एका मल्लामागे त्याचं गाव, समाज, शासन उभं राहतं. चांगली कामगिरी केल्यानंतर सरकारी नोकरी, त्यात प्रमोशन, सरावासाठी सुविधा, आर्थिक मोबदला अशा सर्व गोष्टी हरियाणा, उत्तर प्रदेशसारखी राज्य खेळाडूंना देत आहेत. पण जेव्हा गोष्ट महाराष्ट्राची येते त्यावेळी राहुल आवारे असो किंवा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी…या दोघांना पोलीस सेवेत रुजु होण्यासाठी लागलेले कष्ट आठवून पाहा. आपण मागे का पडतो याचं उत्तर आपल्याला मिळेल. महाराष्ट्र या बाबतीत कुठे कमी पडतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारने ६ कोटींचं बक्षीस जाहीर केलंय…तर महाराष्ट्रात ही रक्कम १ कोटी इतकी आहे.

यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्रातल्या मल्लांचं स्वप्न हे फक्त महाराष्ट्र केसरीपूरतं मर्यादीत राहिलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्यात अनन्यसाधारण महत्व आहे. आजही ग्रामीण भागात अनेक मल्ल या स्पर्धेत गदा मिळवावी यासाठी जीवाचं रान करतात. यातने अनेक मल्ल यशस्वी होतात. पण महाराष्ट्र केसरीचं मैदान गाजवणारे हे खेळाडू नंतर परत कधीच चर्चेत दिसत नाहीत काही सन्मानीय अपवाद वगळता.

आंतरराष्ट्रीय कुस्तीसाठी लागणारी चपळता, मॅटवर खेळण्यासाठी लागणाऱ्या हालचाली या सर्व बाबींचा सराव नसल्यामुळे महाराष्ट्र केसरीचं मैदान गाजवणारे मल्ल नंतर पुढेच येत नाहीत. खेळ कोणताही असो तो मोठा होण्यासाठी आधी मातीत घट्ट रुजवावा लागतो, एकदा का याची बीज खोलवर गेलं की वाढ नक्कीच होते. राज्यात दुर्दैवाने ही बीजच रोवली जात नाहीयेच. यंदाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सहभागी होणाऱ्या ८ खेळाडूंची यादी पाहिली की ही बाब तुम्हालाही लक्षात येईल. त्यामुळे महाराष्ट्र सरकार राज्याचं क्रीडा धोरण बदलेल अशी भाबडी आशा आजही कायम आहे, कारण आशा अमर असते.

Maharashtra Maza News Deskhttps://maharashtramazanews.com
सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments