Home » Uncategorized » तृतीयपंथीय, समलिंगींच्या लसीकरण केंद्रावर अत्यल्प प्रतिसाद

तृतीयपंथीय, समलिंगींच्या लसीकरण केंद्रावर अत्यल्प प्रतिसाद

तृतीयपंथीय,-समलिंगींच्या-लसीकरण-केंद्रावर-अत्यल्प-प्रतिसाद

तृतीयपंथीय आणि समलिंगी नागरिकांसाठी सुरू केलेल्या विक्रोळी येथील विशेष लसीकरण केंद्राला या वर्गाकडून कमी प्रतिसाद मिळत आहे.

टॅक्सीचालक, बांधकाम कामगारांसाठी खुले करण्याचा प्रस्ताव

शैलजा तिवले
मुंबई : तृतीयपंथीय आणि समलिंगी नागरिकांसाठी सुरू केलेल्या विक्रोळी येथील विशेष लसीकरण केंद्राला या वर्गाकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. गेल्या २० दिवसांत या केंद्रावर केवळ ४७७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तेव्हा या केंद्रामध्ये टॅक्सीचालक आणि बांधकाम कामगारांचेही लसीकरण सुरू करावे, असा प्रस्ताव विभागाने पालिकेकडे सादर केला आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील दुर्बल घटकांचे लसीकरण वेगाने सुरू केले आहे. याअंतर्गत विक्रोळी येथील सेंट जोसेफ शाळेमध्ये पालिकेने तृतीयपंथीय आणि समलिंगी नागरिकांच्या लसीकरणासाठी विशेष केंद्र २४ ऑगस्टला सुरू केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. परंतु केंद्रावर लसीकरणासाठी गेल्या काही दिवसांपासून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

२४ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या काळात केंद्रावर ४७७ जणांचे लसीकरण झाले आहे. दिवसाला १० ते १५ जण लसीकरणासाठी येत असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात लसीकरण होऊ शकलेले

नाही.

बांधकाम कामगार आणि टॅक्सी चालकांसाठीही खुले करण्याची मागणी

केंद्रावर लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने  नियुक्त केलेल्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर केला जात नाही. तेव्हा या सुविधांचा वापर योग्य रीतीने होण्यासाठी बांधकाम कामगार आणि टॅक्सी चालकांच्या लसीकरणालाही  केंद्रावर परवानगी देण्याचा प्रस्ताव पालिकेला दिलेला आहे. हे दोन्ही वर्ग अनेकांच्या संपर्कात येत असल्याने यांना बाधा झाल्यास संसर्ग प्रसार होण्याचा धोका आहे. तेव्हा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्राधान्याने यांचे लसीकरण केले जाईल, असे मत डॉ. खंदाडे यांनी व्यक्त केले.

वेश्यांसाठी केंद्र खुले

केंद्रावर फारसे नागरिक लसीकरणाला येत नसल्यामुळे मागील दोन दिवसांपासून वेश्याव्यवसायातील महिलांचे लसीकरणही येथे सुरू केले आहे. या केंद्राचे वैशिष्ट म्हणजे कोणत्याही ओळखपत्राशिवाय लसीकरण करण्याची सुविधा आहे. त्यामुळे या वर्गातील ज्या महिलांकडे ओळखपत्र नाही, त्यांनाही लस घेता येईल, असे एन विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र माझा आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Maharashtra Maza News) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2021 12:40 am

Web Title: very little response third party homosexual vaccination centers ssh 93

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *