Home » Uncategorized » घाण तोंडाचे प्रविण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षामधे कसे ?-सुरेखा पुणेकर

घाण तोंडाचे प्रविण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षामधे कसे ?-सुरेखा पुणेकर

घाण-तोंडाचे-प्रविण-दरेकर-भाजपसारख्या-चांगल्या-लोकांच्या-पक्षामधे-कसे-?-सुरेखा-पुणेकर

सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत बोलत असताना भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा संयम सुटला. राष्ट्रवादीच्या लोकांना रंगलेल्या गालांचा मुका घ्यायची सवयच आहे असं प्रविण दरेकर बोलून गेले. अर्थात भाजपने त्यांचं समर्थनच केलं, प्रविण दरेकर बोली भाषेत बोलून गेले त्याचा विपर्यास करण्यात आला असं स्पष्टीकरण दिलं गेलं.

मात्र लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी याबाबत मुंबई तकला सविस्तर मुलाखत दिली आहे आणि प्रविण दरेकरांना आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं आहे. घाण तोंडाचे प्रविण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

काय म्हणाल्या सुरेखा पुणेकर?

मला दरेकरांबाबत खूप वाईट वाटतं आहे की एवढे मोठे नेते आहेत तरीही त्यांना महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला? आज मी धुण्याभांड्याची कामं करून इथपर्यंत आले आहे. मी जर महाराष्ट्राची कला परदेशात नेऊ शकले, घराघरात मी लावणी कला चुकवली. अशा महिलेला दरेकरसाहेब नावं ठेवत असतील तर ते साफ चुकीचं आहे. महिलांना मान देऊ शकत नाही तर ठीक आहे पण अपमान तरी करू नका. प्रविण दरेकर यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्य़था याचा परीणाम वाईट होईल असं सुरेखा पुणेकरांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश करत आहात म्हणून दरेकर असं बोलले असतील का? असं विचारलं असता सुरेखा पुणेकर म्हणाल्या, असू शकतं. त्यांच्या घरात महिला नाही. गालावरची लाली आता कळली का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश करत असताना कळली का? प्रविण दरेकर यांना हे आत्ताच बोलावंसं का वाटलं? महिलेचा अपमान करणं तुम्हाला शोभलं का? आज तुम्ही भाजपसारख्या मोठ्या पक्षात आहात, पक्ष एवढा मोठा आहे, एवढा चांगला तरीही घाण तोंडाचे तुम्ही त्या पक्षात कसे काय?

प्रविण दरेकर यांची पाठराखण जरी भाजपमधले मोठे नेते करत असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला गप्प बसणार नाही. प्रविण दरेकर यांना माफी मागावीच लागेल. रूपाली चाकणकर जे बोलल्या ते योग्यच आहे. कलाकारांचा चाहता राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा आदर करणारा पक्ष आहे असंही सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे. आता माझा पक्षात प्रवेश होणार आहे. मी अजून काही जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यांच्याकडे मी काही मागितलेलं नाही. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *