Home » Uncategorized » डोंबिवली : पैसे संपलेलं ATM मशिन फोडण्याचा प्रयत्न केला, चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला

डोंबिवली : पैसे संपलेलं ATM मशिन फोडण्याचा प्रयत्न केला, चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला

डोंबिवली-:-पैसे-संपलेलं-atm-मशिन-फोडण्याचा-प्रयत्न-केला,-चोरटा-पोलिसांच्या-जाळ्यात-अडकला

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा उच्छाद पहायला मिळतो आहे. डोंबिवलीत मंगळवारी मध्यरात्री एटीएम मशिन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे संपलेल्या एटीएम मशिनमध्ये हा चोरटा चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. परंतू मशिन फोडण्यात अपयशी ठरल्यानंतर पळून जात असताना एका व्यक्तीने या चोरट्याला पाहिलं आणि पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

याविषयी माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी डोंबिवली शहरात रात्री पाठलाग करत या चोरट्याला ताब्यात घेतलं. मोहम्मद असगर असं या आरोपीचं नाव असून तो मुळचा झारखंडचा आहे. सध्या तो डोंगरी भागात राहतो.

डोंबिवली पूर्वेतील ओजस हॉस्पिटल शेजारी असलेले एटीएम मंगळवारी रात्री सव्वा वाजल्याच्या सुमारास मोहम्मद असगर शेख याने फोडले. परंतू एटीएम मध्ये पैसे नसल्याने त्याला काही माल मिळाला नाही व त्याने तेथून धूम ठोकली. तेथे नोकरी करणारे राहुल शिंदे हे तेथे आले असता त्यांना एटीएम फोडले असल्याचे दिसले. त्यांनी रामनगर पोलीसांना याबद्दल माहिती दिली.

याविषयी माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. टिळकनगर परिसरात मोहम्मद हा संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना दिसला. पोलीस आपल्या मागावर असल्याचं कळताच मोहम्मद या गल्लीतून त्या गल्लीत पळायला लागला. पोलीसही आरोपीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करायला लागले. अखेरीस मोठ्या प्रयत्नानंतर असगर पोलिसांच्या हाती सापडला.

पोलिसांनी असगरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपासणीत स्क्रू ड्रायव्हर व इतर काही साहित्य सापडलं. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला कल्याण सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने आरोपीला एका दिवसाच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली. असगरवर सध्या किती गुन्हे दाखल आहेत याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

1 thought on “डोंबिवली : पैसे संपलेलं ATM मशिन फोडण्याचा प्रयत्न केला, चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *