Ashadhi Ekadashi : …तर पंढरपूरला नाही हंपीत साजरी झाली असती आषाढी एकादशी

आषाढी एकादशी म्हटलं की वेध लागतात ते वारीचे. पंढरपूरच्या वारीची ही परंपरा आजची नाही सुमारे 300 वर्षांपासून चालत आली आहे. माऊली-माऊलीचा गजर करत वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो. भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो. मात्र एका अख्यायिकेनुसार राजा कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरमध्ये स्थापन केली नसती तर आज घडीला पंढरपूरला साजरी होणारी आषाढी एकादशी आणि वारकऱ्यांची वारी हंपीमध्ये साजरी झाली होती. वारकऱ्यांना कर्नाटकातल्या हंपीमध्ये विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जावं लागलं असतं.
काय आहे अख्यायिका?
तुंगभद्रा या नदीच्या काठी चारही बाजूला तटबंदी असलेलं आणि 56 खांब असलेलं हंपीतलं विठ्ठल मंदिर आहे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय यांनी ते मंदिर पंधराव्या शतकात म्हणजेच त्यांच्या कारकिर्दीत उभारलं. पंधराव्या शतकात राजा कृष्णदेवराय यांनी पंढरपूरमधली मूर्ती याच म्हणजे हंपीच्या मंदिरात स्थापन केली होती असं इतिहासकार सांगतात. कृष्णदेवराय यांची विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा होती. त्याची प्रचिती हे मंदिर आणि त्याची भव्यता पाहून येते.
दगडी रथ द्रविडी स्थापत्यशैलीतील एक पीठ मानलं जातं. या रथ पीठावर आरूढ होऊन गरुड भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी जायचे, तसेच या रथामध्ये राजा कृष्णदेवराय यांनी विठुरायची मूर्ती विराजमान केली होती. अशी ही आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच हे रथ वारकरी, भाविक आणि पर्यटकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. मंदिराच्या मधोमध महामंडप आणि याच महामंडपाच्या गाभाऱ्यात विठुरायाची मूर्ती स्थापित होती. एक दिवस राजा कृष्णदेवराय यांच्या स्वप्नात येऊन विठ्ठलाने दृष्टांत दिला आणि माझी मूर्ती पंढरपूरला स्थापन कर असं सांगितलं. स्वप्नातला हा दृष्टांत होताच राजा कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती ही पंढरपूरला आणली मात्र हंपीच्या मंदिरात विठ्ठलाची कुठलीही मूर्ती पुन्हा स्थापन केली नाही. त्यामुळे हंपीला जे विठ्ठल मंदिर आहे त्यात विठ्ठलाची मूर्ती नाही. हंपीतल्या विठ्ठल मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हे मंदिर विठ्ठलाच्या मूर्तीविनाच उभं आहे. राजा कृष्णदेवराय यांच्या स्वप्नात विठ्ठलाने येऊन दृष्टांत दिला नसता तर विठ्ठलाचं मंदिर पंढरपूरमध्ये नाही तर हंपीतच राहिलं असतं आणि वारकऱ्यांना तसंच तमाम भक्तांना दर्शनासाठी हंपीला जावं लागलं असतं. आषाढी एकादशीही तिथेच साजरी झाली असती. मात्र कृष्णदेवराय यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे विठ्ठल दर्शन पंढरपूरला जाऊन घेणं हे भाग्य महाराष्ट्राला लाभलं आहे.