Home » महाराष्ट्र » अल्टिमेट खो-खो लीग : खो-खोपटू विजय हजारेची संघर्षगाथा..

अल्टिमेट खो-खो लीग : खो-खोपटू विजय हजारेची संघर्षगाथा..

अल्टिमेट-खो-खो-लीग-:-खो-खोपटू-विजय-हजारेची-संघर्षगाथा.

पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे.

संदीप कदम

मुंबई : पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत विजयने खो-खोची कास धरली आणि आपला कठीण प्रवास सुरू केला. आता तो भारतीय रेल्वेच्या संघात आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेले परिश्रम तो विसरला नाही.

‘‘सुरुवातीला मी कबड्डी खेळत होतो. नंतर मी गोविंदराव हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. या शाळेला खो-खोची मोठी परंपरा आहे. शाळेतील सरांनी मला खो-खो खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर जय हिंदू मंडळात सहभागी झालो. या क्लबचे नऊ खेळाडू सध्या रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. मंडळाकडून खेळायला लागल्यापासून कामगिरीत सुधारणी झाली. १८ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेनंतर कोल्हापूरकडून २०१३ मध्ये झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी माझी निवड झाली. यानंतर चांगल्या खेळाच्या बळावर मला रेल्वेत नोकरी मिळाली. रेल्वेत सहभागी झाल्यानंतर पाच वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धामध्ये माझा समावेश होता,’’ असे विजय म्हणाला.

‘‘मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून वडिलांचा पानपट्टीचा व्यवसाय आहे आणि आई गृहिणी आहे. माझ्या आईलाही खो-खोची आवड होती, मात्र प्रोत्साहन न मिळाल्याने तिला खेळता आले नव्हते. कुटुंबाने मला नेहमीच पाठींबा दिला आहे. इचलकरंजी येथे चंदूर नावाच्या गावी मी भाडय़ाने राहतो आणि आमचे दुकानही भाडय़ानेच आहे,’’ असे सध्या मध्य रेल्वेत कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेल्या विजयने सांगितले.

‘‘अल्टिमेट खो-खो लीगमुळे अनेक युवा खेळाडूंना खेळात कारकीर्द घडवण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यापूर्वी खो-खोमध्ये कारकीर्द करण्याच्या दृष्टीने कोणीही पाहात नसत, मात्र या लीगच्या माध्यमातून हे चित्र बदलेल.  येणाऱ्या काळात खेळाडूंना अनेक संघांमध्ये खेळण्याची संधी मिळेल. तसेच, या लीगमुळे खेळाडूंना आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यास मदत मिळणार आहे,’’ असे अल्टिमेट लीगबद्दल विजय म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published.