कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 19 वर; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुंबई: कुर्ल्यातील नेहरू नगर येथील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 19 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शोध मोहीम अद्याप सुरूच आहे. सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास नाईक म्युनिसिपल सोसायटीची 4 मजली इमारत कोसळली. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही बीएमसीने दिली होती, असे असतानाही या इमारतीत अनेक कामगार भाड्याने राहत होते, या इमारतीत किती लोक होते याचा नेमका आकडा कोणाकडेच नसला तरी सध्या अग्निशमन दल, एनडीआरएफची शोधमोहीम सुरू आहे.
सर्व कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एकूण 33 कामगारांना बाहेर काढण्यात आले, त्यात 19 कामगारांचा मृत्यू झाला आहे. 4 कामगारांवर उपचार सुरू आहेत, तर 10 कामगारांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.